पुणे : मूलभूत विज्ञानाचा बहुतांश गाभा गृहविज्ञान (होम सायन्स) शाखेत सामावलेला असून, त्याचे योग्य प्रकारे उपयोजन केल्यास मानवी जीवन सुकर होईल, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. एसएनडीटी विद्यापीठाच्या पुणे आवारातील गृहविज्ञान महाविद्यालयातील पदवीप्रदान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. एसएनडीटी पुणे आवार समन्वयक प्रो. शितल मोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. चार भिंतींच्या आत जखडलेल्या शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करून विद्यार्थ्याला जीवनाचे अनुभव देणारे व्यापक शिक्षण देण्याची व्यवस्था व्हायला हवी. होम-सायन्स ही विज्ञानाची विद्याशाखा सर्वार्थाने आपल्या घरापासून सुरू होते. रोजगार, स्वयंरोजगार याचबरोबर व्यक्तीच्या आत्मनिर्भरतेसाठी ही शाखा उपयुक्त आहे. याप्रसंगी त्यांनी छत्तीसगडमधील आदिवासी समाजातील पारंपारिक कौशल्याचे उदाहरण दिले. येथील मृदेमधील लोह, तांबे, याशिवाय सोन्यासारखे धातू वेगळे करण्याची कला लहान वयातील मुलांना देखील अवगत आहे.

चित्रकला, वारली पेंटिंग यांसारख्या कला देशभरातील स्थानिक समुदायांनी परंपरेने विकसित केल्या आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. कॅनडामधील ज्युली आणि फ्लोरा या शाळकरी विद्यार्थिनींनी शोधलेल्या वनस्पतीला ‘ज्युली-फ्लोरा’ हे शास्त्रीय नाव कसे मिळाले, याचा प्रसंग श्री. प्रभुणे यांनी सांगितला. जीवनात स्वतः कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेतलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या हस्ते पदवीप्रदान सोहळा संपन्न होणे, हा एक प्रकारे सामाजिक कार्याचा गौरव आहे, असे उद्गार त्यांनी काढले. प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर भाषणातून उपस्थितांचे स्वागत केले आणि पदवी प्राप्त विद्यार्थिनींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मिळालेली पदवी म्हणजे पुर्णपणे तुमचे व्यक्तिमत्त्व नव्हे. मात्र पदवीसोबत मोठी जबाबदारी, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व तुमच्यावर आहे. योग्य कर्म करुन सर्वांगिण विकासाची प्रक्रिया निरंतर चालू ठेवा, ‘स्वयंपूर्ण संस्कृता’ बनून समाजाचे नेतृत्व करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले. सामाजिक कार्यकर्ते मा. संतोष परदेशी तसेच रोटरी क्लब आणि लायन्स क्लबने महाविद्यालय आणि विद्यापीठास वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल प्राचार्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

याप्रसंगी मॅनेजमेंट कौन्सिल सदस्या श्रीमती पौर्णिमा मेहता तसेच एसएनडीटी पुणे आवार समन्वयक प्रो. शितल मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याशिवाय गृहविज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रो. सचिन देवरे आणि डॉ. वृषाली नगराळे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमास विद्यापीठाचे सिनेट प्रतिनिधी प्रा. सुरेंद्र निरगुडे, विद्यापीठाच्या पुणे आवारातील प्राचार्य, आजी-माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पदवी-प्राप्त विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.