१० मीटर एअर रायफल स्पर्धेत १४ वर्षाखालील गटात जिंकले पदक
उंड्री येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या नेमबाजी खेळाडूंनी सीबीएसई राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्य पदकावर शिक्कामोर्तब केले. नुकतीच ही स्पर्धा उत्तर प्रदेश मधील ग्रेटर नोएडा येथील जेपी पब्लिक स्कूल मध्ये संपन्न झाली. स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर पुण्यात आगमन झाल्यावर ध्रुव ग्लोबल स्कूलचे विश्वस्त यशवर्धन मालपाणी, संचालिका अनिष्का मालपाणी व प्राचार्या शारदा राव यांनी सर्व खेळाडु तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत नेमबाजी खेळाडू गंधर्वी शिंदे, इवा मोदी, मैत्राई दाते, अद्वैत शिंदे, अनन्या कांबळे, अहान कुमार, विक्रमादित्य सिंग परमार आणि दिशांक टिटोरिया यांनी उत्कृष्ट कामगिरी करुन शाळेचे नाव उज्ज्वल केले. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने १० मीटर्स एअर रायफल प्रकारात रौप्य पदक मिळविले. १४ वर्षाखालील मुलींच्या संघानेही दमदार कामगिरी करताना याच क्रीडा प्रकारात सहावे स्थान पटकाविले. तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात १३वें स्थान मिळवले.
शाळेने आपल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला. संघाच्या यशात महत्वाची भूमिका बजावाणार्या प्रशिक्षक उज्ज्वला बोराडे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या निकालांनी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या तरूण नेमबाजांची वाढती प्रतिभा आणि दृढनिश्चय अधोरेखित केले. तसेच त्यांच्या समवयस्कांसाठी एक प्रेरणादायी उदाहण ठेवले.
प्राचार्य शारदा राव यांनी सांगितले की, संस्थेने खेळाडूंना उत्कृष्ट क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या आधुनिक सुविधा आणि डॉ. संजय मालपाणी यांच्या आशीर्वादामुळे खेळाडू सातत्याने असाधारण कामगिरी करत आहेत आणि नवीन उंची गाठत आहेत.