यु हॅव गॉट द मेल हा चित्रपट पाहिल्यावर टॉम हँक्सचे इतर चित्रपट पाहावे अशी इच्छा जागृत झाली. मनोज कुलकर्णी यांनी सांगितले की टॉमचे सगळेच चित्रपट उत्तम आहेत
सुरुवात केली सल्ली या चित्रपटाने.
सल्ली हा चित्रपट २०१६ मध्ये आला होता. निर्माता आणि दिग्दर्शक क्लिंट ईस्टवुड आहे. २०१६ मधील टॉप टेन चित्रपटातील हा चित्रपट आहे.
ध्वनि संपादन (sound editing )साठी नामांकन या चित्रपटाला आहे.
पायलट विमान चालवत असताना विमानाला पक्षांची टक्कर होते. विमानाची दोन्ही इंजिने बंद पडतात. पायलटला विमान नाईलाजाने हडसन नदीत उतरवावे लागते. सगळ्यांचा जीव वाचतो.
पण सुरू होते चौकशी.
नदीत विमान उतरवण्याचा निर्णय पायलटचा योग्य होता की अयोग्य. चौकशी सुरू असताना पायलटला कुटुंबापासून दूर ठेवले जाते.
विमान नदीत उतरवण्याचा निर्णय जेव्हा पायलट घेतो, एअर ट्रॅफिक कंट्रोलरला तो सांगतो की माझा नाईलाज आहे. तेव्हा चक्क एअर ट्रॅफिक कंट्रोलर च्या डोळ्यात पाणी येते.
दोन प्रकारच्या प्रतिक्रिया या घटनेला येत असतात.
सकारात्मक अशी लोक पायलटला हिरो म्हणून उदो उदो करतात. कारण त्याने १३० प्रवेशांचा जीव वाचवलेला असतो.
नकारात्मक अशी की प्रशासन विमान नदीत उतरवण्याचा निर्णय चुकीचा ठरवते.
प्रचंड मानसिक आंदोलनातून पायलट या कालावधीत जात असतो. बायकोशी फक्त फोनवर बोलून मी ठीक आहे हे सांगताना मनातील तुफानाचा थांगपत्ता बायकोला किंवा इतर कोणालाही लागू देत नाही.
चाळीस वर्षांपासून पायलट विमानसेवा देत असतो. कोणतेही दुर्घटना या काळात घडलेली नसते.
चौकशी,कोर्ट मार्शल यामध्ये सिमुलेशनचे वेगवेगळे प्रकार दाखवले जातात. डावे इंजिन सुरू होते असा ठपका पायलट वर ठेवला जातो.
चौकशीचा निर्णय काय लागतो. पायलट निर्दोष सुटतो का हे पाहण्यासाठी चित्रपट पाहावा लागेल.
अत्यंत थरारक आणि वेगवान घटनेच्या चौकशीचा शेवट, अर्थातच थरारक होतो.
१५ जानेवारी २००९ मध्ये प्रत्यक्ष घटना घडलेली आहे.
त्यावर चित्रपट आहे. फ्लाईट 1549 हे विमान असते.
विमान नदीत पडल्यापासून सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका व्हायला अवघे २४ मिनिट लागतात. प्रशासन सतर्क असल्यामुळे, सगळ्या प्रवाशांची सुखरूप सुटका होते.
सोलापुरात नुकतीच विमानसेवा सुरू झाली आहे.
सोलापूर मुंबई विमान नाईलाजाने भीमा नदीत उतरवावे लागले तर काय होऊ शकेल याचे गमतीशीर चित्र मनात उभे राहिले.
पायलटची भूमिका अर्थात टॉमने ने केली आहे.
सोलापूरच्या विमानसेवेचा तुम्ही लाभ घेतला की नाही मला कल्पना नाही, पण टॉमच्या विमानाची सफर तुम्ही जरूर करा.
सदर चित्रपट ॲमेझॉन प्राईमवर
उपलब्ध आहे हिंदी सब टायटल्स सहित.
- -श्रीधर मधुकर खेडगीकर(सोलापूर)


