मुंबई : राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सदनिका घोटाळा प्रकरणातील न्यायालयीन निकालानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी त्याला मान्यता दिली आहे. यानुसार, कोकाटे यांच्याकडील सर्व खाती तात्पुरत्या स्वरूपात अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहेत.
नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी (१६ डिसेंबर) सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर बुधवारी (१७ डिसेंबर) जिल्हा न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती.
अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकाटे यांना अस्वस्थ वाटू लागले असून, ते मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. कोकाटे यांनी या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, शुक्रवारी (१९ डिसेंबर) सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
कृषिमंत्री कोकाटे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभेचे आमदार आहेत. विधानसभेत रम्मी खेळण्यामुळे अडचणीत आल्यानंतर त्यांचे कृषिमंत्रिपद काढून घेण्यात आले. यानंतर त्यांना युवक कल्याण आणि क्रीडाखाते देण्यात आले होते. १९९५ ते ९७ काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कोकाटे यांनी घर घेतले. कोकाटे यांनी १० टक्के कोट्यातील घरासाठी कमी उत्पन्न दाखवले असल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल केला होता.
जवळपास तीन दशके या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी कोकाटेंविरोधात याचिका दाखल केली होती. दिघाळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कोकाटेंविरोधात भादंवि ४२०, ४६५, ४७१,४७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांच्या भावाच्या विरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.


