33.4 C
New Delhi
Sunday, June 14, 2026
HomeTop Five Newsपुण्यात महापौर निवडणूक अटळ

पुण्यात महापौर निवडणूक अटळ

भाजपकडे बहुमत असले तरी मतदान होणार

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. महापालिकेत भाजपकडे स्पष्ट संख्याबळ असल्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असला, तरी महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. महापौर व उपमहापौर पदांसाठी अंतिम निर्णय ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेतील मतदानातूनच लागणार आहे.

त्याच दिवशी महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, उपमहापौरपदासाठी भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सुरुवातीला ही निवडणूक केवळ औपचारिक ठरेल, असे चित्र होते. मात्र विरोधकांनी उमेदवार उतरवल्याने लढत अटळ ठरली आहे.

महाविकास आघाडीत अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी महापौर व उपमहापौर पदांसाठी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदासाठी नगरसेविका शीतल सावंत तर उपमहापौरपदासाठी दत्ता बहिरट यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडून महापौरपदासाठी अश्विनी लांडगे आणि उपमहापौरपदासाठी साहिल केदारी निवडणुकीच्या मैदानात आहेत.

यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता संपुष्टात आली असून, मतदानातूनच निकाल लागणार आहे. मात्र महासभेच्या दिवशीपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे मंजुषा नागपुरे यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट मानली जात आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच सिंहगड रोड परिसरात उत्साहाचे वातावरण असून, या भागातून प्रथमच महापौर मिळणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये विकासाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. यापूर्वी याच परिसरातील प्रसन्न जगताप यांनी उपमहापौरपद भूषवले होते.

मंजुषा नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजय मिळवला होता. महापालिकेच्या कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव असून त्यांनी स्थायी समितीसह विविध महत्त्वाच्या समित्यांवर काम केले आहे. संघटनात्मक पातळीवर सक्रिय आणि पक्षनिष्ठ नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.

महापौरपदासाठी भाजपकडून यापूर्वी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांची नावे चर्चेत होती. मात्र राजकीय समतोल लक्षात घेऊन सध्या या नावांवर विराम देण्यात आल्याचे समजते. वर्षा तापकीर यांना भविष्यात संधी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मंजुषा नागपुरे या पुण्याच्या दहाव्या महिला महापौर ठरणार आहेत. याआधी कमल व्यवहारे (१९९२) या पुण्याच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या होत्या. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चव्हाण, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, दिवंगत चंचला कोद्रे आणि मुक्ता टिळक यांनी महापौरपदाची जबाबदारी सांभाळली आहे.



“भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांनी महापौर व उपमहापौर पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे सभागृहातील मतदानानंतरच अंतिम निर्णय होईल. पुणेकरांचे लक्ष आता ९ फेब्रुवारीच्या महासभेकडे लागले आहे.”
योगिता भोसले, नगर सचिव, पुणे महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
33.4 ° C
33.4 °
33.4 °
33 %
1.8kmh
0 %
Sun
42 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
40 °
Thu
41 °

Most Popular

Recent Comments