पुणे – “कधीकाळी आम्ही महाराष्ट्र विधानसभेत जनतेचे प्रतिनिधी म्हणून बसलो होतो, तेव्हा सभागृह हे संवाद, मतभेद आणि जनहितासाठीच्या लढाईचे पवित्र मंदिर होते. पण आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की, पुन्हा त्या ‘मंदिरात’ प्रवेश करण्याची आमची इच्छाच संपली आहे.” अशा उद्विग्न भावना पुण्यातील माजी आमदारांनी व्यक्त केल्या.
पुण्यात युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ माजी आमदारांनी विधानसभेतील वाढत्या गुंडगिरी, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि विरोधकांवरील हल्ल्यांविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. डॉ. कुमार सप्तर्षी, ॲड. वंदना चव्हाण, ॲड. जयदेवराव गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, ॲड. एल.टी. सावंत आणि संयोजक राहुल डंबाळे यावेळी उपस्थित होते.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, “लोकशाहीच्या प्रणालीत सत्ताधारी पक्षाने विरोधकांना वैरी मानणे अयोग्य आहे. पण आता विधानसभेत नामांकित गुन्हेगारांना घेऊन येऊन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर हल्ले घडवले जात आहेत. १६ जुलै २०२५ रोजी झालेली घटना तर लोकशाहीसाठी कलंक ठरली आहे. लोकशाहीचे मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो.”
रामदास फुटाणे यांनी राज्यातील राजकारणातील गुन्हेगारीकरणावर टीका करत “आज गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनीच सरकार ताब्यात घेतले आहे. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी गोंधळ आणि हिंसा सुरू आहे,” असे सांगितले.
ॲड. वंदना चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला की, “राज्यात गृहमंत्री आहेत की नाही? असतील तर अशा घटनांवर कारवाई का होत नाही? शिक्षण, शेती, रोजगार यांसारखे गंभीर विषय दुर्लक्षित होत असताना विधिमंडळ गोंधळाचे अड्डे बनले आहेत.”
बाळासाहेब शिवरकर यांनी नमूद केले की, “राज्याच्या संविधानिक सभागृहाने जनतेला दिशा देण्याचे काम करणे अपेक्षित असते. मात्र आता तेथे मारामारी, धमक्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारे प्रकार सुरू आहेत.”
ज्येष्ठ माजी आमदारांनी या पत्रकार परिषदेत एकमुखाने विधानसभेतील अशा घटनांचा निषेध नोंदवून, “आजचे विधीमंडळ बरखास्त करून जनतेसमोर नव्या निवडणुकीची वेळ आली आहे,” असे स्पष्ट केले.