पुणे, : पुणे शहरात परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताना उल्लेखनीय कार्यगौरव मिळवलेले आयपीएस अधिकारी संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे.
गिल यांचा शिस्तप्रिय, संवेदनशील व परिणामकारक कारभार हा पुणे शहरातील अनेक उपक्रमांमध्ये अनुभवास आला आहे. त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात अत्यंत कौशल्याने कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडली होती. विविध गणेश मंडळांशी समन्वय राखत, पोलिस दलाचे नियोजन करत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणं हे त्यांचं खास वैशिष्ट्य ठरलं.
शहराच्या मध्यवर्ती भागात वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर गिल यांनी कठोर पावले उचलून गुन्हेगारांवर वचक बसवला. विशेषतः टोळीगिरी, खंडणी आणि रात्र-अपरात्रीचे गुन्हे यावर नियंत्रण मिळवण्यात त्यांचा हातभार होता.
गिल यांचं एक वेगळेपण म्हणजे त्यांनी अल्पवयीन गुन्हेगारांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसन कार्यक्रम सुरू केले. या उपक्रमांतर्गत किशोर गुन्हेगारांना सुधारण्यासाठी समुपदेशन, शिक्षण आणि कौशल्यविकासाची संधी देण्यात आली.
गिल यांची ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी सप्टेंबर २०२४ मध्येच शिफारस झाली होती. मात्र, तत्कालीन एसपी पंकज देशमुख यांची केवळ सात महिन्यांतच झालेली बदली आणि त्याविरोधातील कॅटमधील याचिकेमुळे गिल यांच्या बदलीला विलंब झाला. देशमुख यांची नुकतीच पुणे शहरात अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाल्यानंतर अखेर संदीपसिंग गिल यांची एसपी पदावर वर्णी लागली.
पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा औद्योगिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून गुंतागुंतीचा आहे. या भागात कायदा-सुव्यवस्थेचं योग्य नियोजन करणे, नक्षलप्रभावित क्षेत्रांवर लक्ष ठेवणे, तसेच महिलांवरील गुन्ह्यांमध्ये कमी करणे यांसारख्या आव्हानात्मक जबाबदाऱ्या गिल यांच्यासमोर असणार आहेत.
पोलिस दलात प्रशासकीय दृष्टिकोन, संवादक्षमता आणि कणखर निर्णयक्षमता या गुणांचा संगम असलेल्या गिल यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण पोलिस दलाला नवी दिशा आणि गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.