पुणे- लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये बारामतीचा महत्त्वपूर्ण निकाल होता. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विजयश्री खेचून आणला. बारामतीमधील सहाही विधानसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आघाडी होत्या. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला. पवार कुटुंबातील दोन्ही उमेदवार असल्यामुळे सर्वांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. यानंतर सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यामध्ये भेट दिली. यावेळी शरद पवार गटाच्या पुणे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत करत विजयी मिरवणूक काढली. पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी विजयी शक्तीप्रदर्शन करत माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे यांची पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये वाजत गाजत आणि गुलाल उधळत मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, या निकालामधून हे दिसत आहे की लोकांनी या दडपशाहीला नाकारले आहे. संविधान वाचवले असून संविधानाच्या चौकटीमध्येच हा देश चालेल याचा प्रत्यय लोकांनी आणून दिला आहे. भष्ट्राचाराला, महागाईला, बेरोजगाईला मतदारांनी नाकारले आहे. पदाधिकाऱ्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी अपार कष्ट केले. त्यामुळे मी सर्व मतदारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना नतमस्तक होऊन आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर दाखवला. आता जबाबदारी आणखी वाढली आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाई ही ती कोणत्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये नसते. मी प्रचारावेळी देखील म्हणाले होते की ही वैचारिक लढाई आहे. माझी लढाई विचारांविरोधात आहे. बेरोजगारी विरोधात आहे. भष्ट्राचाराच्या विरोधात आहे. या सरकारने शेतकऱ्यांचं कबंरड मोडण्याचे जे काम केलं आहे त्याच्या विरोधामध्ये माझी ही लढाई आहे. मागील वर्ष संघर्षाचं होतं. दुष्काळ, महागाई, बेरोजगारी अशी मोठी आव्हान राज्याच्या समोर होती. राज्यात छावण्या नाहीत, चारा डेपो नाही. पाण्याचे टॅंकर वेळेवर पोहचत नाहीत. या परिस्थितीला लोक कंटाळले होते. असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
जय व पार्थ हे माझ्या मुलांसारखे
तसेच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यावर देखील प्रतिक्रिया दिल्या अजित पवार गटाने वेगळा विचार केल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे. अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या का यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, वयाने व कतृत्वाने मोठ्या असलेल्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो. त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो. माझी लढाई ही व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही तर विचारांच्या विरोधात आहे. तसेच सुनेत्रा पवार या माझ्या मोठ्या वहिनी आहेत. त्या वयाने, मानाने आणि पदाने माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यांच्याबदद्ल माझ्या मनात नेहमी आदर व प्रेम राहिल. तसेच जय व पार्थ हे माझ्या मुलांसारखे आहेत. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.