“शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व सर्व संस्कृतींमध्ये कायम आहे; ही चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारांचे मंत्री चंद्रकांत पाटील व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरण
मुंबई,- : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, न्यू मरीन लाईन्स, चर्चगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार २०२३-२४ यांचे वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ग्रंथालय संचालनालयाने तयार केलेल्या पुरस्कार परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय संचालनालयाचे प्र. संचालक श्री. अशोक गाडेकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार व अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले.
आपल्या भाषणात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ग्रामीण व शहरी विभागनिहाय पुरस्कार संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी मागील वर्षांच्या अनुभवांचा उल्लेख करत पुरस्कार रक्कम वाढविण्याची आणि वेळेत कार्यक्रम आयोजित करण्याची गरज मांडली. राष्ट्रीय पुस्तक मेळ्यांमधील विक्रीची यशस्वी उदाहरणे देत, समाजातील वाचनसंस्कृती अद्याप जिवंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यांनी वाचनसंस्कृतीचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करताना ग्रामीण व शहरी भागातील वाचनाच्या स्वरूपातील वेगळेपणावर चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. ग्रंथालय पुनर्बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, CSR निधी आणि आमदार निधी अशा विविध स्रोतांमधून आर्थिक मदत मिळवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, या चळवळीत समाजाच्या सर्व घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
समारोपात डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रेरणादायी शब्दांत सांगितले, “शब्दाचे आणि वाचनाचे महत्त्व सर्व संस्कृतींमध्ये कायम आहे; त्यामुळे ही चळवळ अधिक व्यापक करणे आवश्यक आहे.” त्यांच्या भाषणाने ग्रंथालय चळवळीला नवचैतन्य लाभले.