‘
पुणे : प्रा. विजयकुमार भवारी लिखित ‘जागतिक वारसा स्थळांचा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या पुणे आवारात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य आणि पुणे आवार समन्वयक डॉ. शितल मोरे, अधिसभा सदस्य प्रा. सुरेंद्र निरगुडे, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे, तसेच गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. सुरेंद्र निरगुडे यांनी पुस्तकातील प्रकरणांचा आढावा घेतला. जागतिक पर्यटनासाठी चालना देण्यास आणि वाचनाची भूक चाळविण्यासाठी हे पुस्तक पूरक आहे. जागतिक वारशांचे जतन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. प्रो शितल मोरे यांनी भवारी सरांची लेखक, एक भला माणूस आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून असलेली ओळख अधोरेखित केली. वारसा स्थळांबद्दलचे लेखन हा अभिनव प्रयोग असून एसएनडीटी महिला विद्यापीठाचा इतिहास देखील भवारी सरांनी शब्दबद्ध करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सदर पुस्तकातून वारसा स्थळांबद्दलच्या संकल्पना अभ्यासपूर्वक स्पष्ट केलेल्या असून संशोधनासाठी संदर्भ साहित्य म्हणून पुस्तक उपयुक्त असल्याचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे म्हणाले. प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी पर्यटनछंदाचे शब्दरूपात संकलन केल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन केले. या पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पुस्तकाचे लेखक प्रा. भवारी यांनी लेखकाच्या दृष्टिकोनातून पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. पुस्तकाच्या प्रवासात सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांप्रती त्यांनी ऋण व्यक्त केले. शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होण्याची पूर्ण क्षमता असल्याचे मत त्यांनी मांडले. हे पुस्तक लवकरच इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रशांत चौधरी यांनी केले. प्रा. राजेंद्र कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. एसएनडीटी पुणे आवारातील विविध विभागप्रमुख, आजी/माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थिनी कार्यक्रमास उपस्थित होत्या.