पुणे : ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे या संस्थेतर्फे तृतीय पदवी प्रदान सोहळा व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक २० आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. पद्मावती येथील विणकर सभागृह येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळात हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश कुलकर्णी गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अंक ज्योतिष अभ्यासक प्रसाद शिरोडकर उपस्थित होते.
मुख्य पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम सकाळी १० वाजता होणार आहे. त्यामध्ये वास्तुविशारद, लोलक विशारद, अंक विशारद, वास्तुभूषण वर्गाच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी दत्त उपासक गुरुश्री प्रिया मालवणकर, ज्योतिषशास्त्री अंजली पोतदार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तृतीय पदवी प्रमाणपत्र सोहळ्याअंतर्गत विविध वयोगटातील व विविध अभ्यासक्रमा अंतर्गत तब्बल १५० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि पारितोषिक देण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, रविवारी दुपारी २ वाजता वास्तू रत्न, विशेष लक्षवेधी, अचिव्हमेंट आॅफ द इयर आणि इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी रमलगुरु चंद्रकांत शेवाळे, अॅड. सुनिता पागे, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष ज्योतिष शास्त्री अनिल चांदवडकर , श्रौतस्मार्त अभ्यासक अनिरुद्ध इनामदार गुरुजी यांसह इतरही मान्यवर उपस्थित राहतील.
ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर यांना रत्नमाला पुरस्कार, गुरुश्री प्रिया मालवणकर यांना शारदा पुरस्कार, अंजली पोतदार यांना अक्षरलक्ष्मी पुरस्कार आणि अनिरुद्ध इनामदार गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्काराने गौरवण्यात येईल. दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच संस्थेतर्फे सुरू असलेल्या अभ्यासक्रमात पारंगत होऊन अनेक विद्यार्थी आज यशस्वीरित्या समाजात कार्यरत आहेत.