‘
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल.
प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ आणि त्यावर सिंहाच्या २ मूर्ती लावण्यात येणार आहेत. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक येणार आहे. देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, प्रभात बँड, मयूर बँड आणि गंधाक्ष ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग असणार आहे. प्रतिष्ठापनेनंतर दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.