तेजज्ञान फाउंडेशनतर्फे, पुणे स्थित मनन ज्ञान ध्यान केंद्र, सिंहगड रोड येथे ‘छोटे यकीन का बडा जादू’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेषतः युवा वर्गाने यात भाग घेऊन आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणावे, असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून सुमारे 1800+ लोकांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तर 13500+ लोक ऑनलाइन सहभागी झाले होते. लहान लहान विश्वासही आपल्या आयुष्यात मोठे परिवर्तन आणतात. माणूस चुकीच्या धारणांच्या साखळ्यांनी जखडला गेला आहे. त्यामुळे एखादी गोष्ट आपण करू शकणार नाही, असं त्याला वाटतं. वास्तवात काहीही अशक्य नाही, हे कल्पना चावला हिचे उदाहरण देऊन सरश्री यांनी सांगितले. विविध कहाण्या तसेच दृक्श्राव्य माध्यमाचा उपयोग करून उपस्थितांच्या मनावर हे बिंबवण्यात आले की स्वतःवर ठाम विश्वास असल्यास काहीही करणे अशक्य नाही.
नियमित ध्यानसाधना केल्याने नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे आणि शुभ विचारांकडे वळता येते. यासाठी उपस्थितांकडून एका छोट्या ध्यानाचा सराव करवून घेण्यात आला. हा सराव पुढे 21 दिवस सुरू ठेवून ध्यानसाधनेला आपल्या आयुष्याचा भाग बनवावे, असे आवाहन सरश्री यांनी उपस्थितांना केले. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांनी विचारांना योग्य दिशा देऊन, आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यायोगे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशाने तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना केली आहे. मनन ज्ञान ध्यान केंद्र येथे याच उद्देशाने विविध शिबिरांचे आयोजन केले जाते.