पुणे : नाना शंकरशेट यांच्या स्मारकासाठी जागा मिळावी, परिषदेचे १५ विभाग असून त्याअंतर्गत युवा, महिला शिबीरांचे नियोजन व्हावे, दैवज्ञ समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होईल याकडे लक्ष केंद्रित करावे, असे ठराव अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे पुण्यातील सभेत करण्यात आले.अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नति परिषदेतर्फे २१ वे अधिवेशन आणि १० वे दैवज्ञ साहित्य संमेलनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते. समारोप प्रसंगी समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ.आनंद पेडणेकर, समाजश्रेष्ठी उदयराव गडकरी , चंद्रशेखर दाभोळकर, साहित्य संमेलनाध्यक्ष कृष्णी वाळके आदी उपस्थित होते.
श्री अष्टभुजा दुर्गादेवी इस्टेट ट्रस्ट, पुणे या संस्थेच्या यजमानपदाखाली हे आयोजन करण्यात आले होते. कमिटीचे सरपंच व स्वागताध्यक्ष अजय कारेकर, चिटणीस अरुण गडकरी, खजिनदार संजय चाचड, विश्वस्त नंदकुमार पेडणेकर, रत्नाकर काकतिकर यांनी संमेलनात आयोजनाकरिता विशेष परिश्रम घेतले.
समारोप सभेत विविध ठराव मांडून त्यावर चर्चा झाली. युवा, महिला विभाग आणि देशभरातील पतपेढी सक्षम करण्यासाठी पावले उचलली जातील. तळागाळातील समाज बांधव कुठल्याही समस्येला तोंड देण्यासाठी समर्थ असला पाहिजे, याकडे लक्ष देऊन त्या दिशेने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील आणि सामाजिक बांधिलकी जपली जाईल, असा निर्धार उपस्थित ज्ञाती बंधू भगिनींनी महा सोहळ्याच्या सांगता समारंभात केला.
साहित्य संमेलनात समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी यांची ग्रंथ तुला करून विविध लेखकांची पुस्तके उपस्थितांना भेट देण्यात आली. विविध विषयांवर सत्रे, व्याख्याने, मार्गदर्शन असे अनेक कार्यक्रम यानिमित्ताने पार पडले.