पुणे, – पुणे शहरात ब्राह्मण मतदारांची संख्या सुमारे 16 ते 18 टक्के एवढी असतांना राजकीय पक्षांकडून नेहमीच ब्राह्मण उमेदवारांना डावलले जात असल्याची भावना आहे, त्यामुळे येत्या पुणे महानगरपालिका निवडणूकीमध्ये ब्राह्मण समाजाला योग्य आणि पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांना सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आज येथे आवाहन करण्यात आले. यावेळी समन्वयक भालचंद्र कुलकर्णी, सह-समन्वयक ॲड. ईशानी जोशी, प्रवक्ते विश्वजीत देशपांडे, राजकीय समितीचे सदस्य विश्वनाथ भालेराव, मंदार रेडे, मकरंद माणकीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सकल ब्राह्मण समाज समितीमध्ये पुण्यातील आम्ही सारे ब्राह्मण, परशुराम हिंदू सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, अ. भा. ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र चित्पावन संघ, चित्पावन अस्तित्व संस्था, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था, याज्ञवल्क्य आश्रम, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती ब्राह्मण मंडळ, पुणे, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक), पुणे केंद्र, विप्र फौंडेशन, सर्वशाखीय ब्राह्मण महासंघ, पौरोहित्य पुरोहित फौंडेशन, गौड सारस्वत ब्राह्मण संघ अशा सुमारे 30 ब्राह्मण संस्था, संघटना सदस्य आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये देखील ब्राह्मण समाजातील सुमारे 50 कार्यकर्ते निवडून आले आहेत. एकट्या मराठवाड्यात 5 ठिकाणी ब्राह्मण नगराध्यक्ष निवडून आले आहेत. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने ब्राह्मण उमेदवार निवडून आले आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी देखील ब्राह्मण समाजातील अनेक चांगल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. महाराष्ट्रातील विविध 29 महापालिकांच्या निवडणूकीत देखील याची पुनरावृत्ती व्हावी, यादृष्टीने ब्राह्मण उमेदवारांना पुरेसे प्राधान्य द्यावे, प्रामुख्याने ब्राह्मण बहुल असलेल्या प्रभागांमध्ये याचा नक्कीच विचार व्हावा असे सर्वच राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. याबरोबरच सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारांना प्राधान्य देण्यात द्यावे, त्यामध्ये आरक्षित समाजातील उमेदवारांना तिकीट देऊ नये, असे देखील आवाहन आम्ही राजकीय पक्षांना केले आहे.
याबाबत भाजप म्हणून आम्ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून निवेदन दिले आहे, ज्यात विविध प्रभागातील सुमारे 30 उमेदवारांची यादी देखील दिलेली आहे व यावर सकारात्मक विचार होईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांना देखील हे आवाहन केलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या पुण्याची नेत्यांना देखील आम्ही लवकरच भेटणार आहोत.
––—


