ग्रंथदिंडी, राष्ट्रीय चर्चासत्र, विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण!
कुलगुरू डॉ. राजनीश कामत, देविदास पोटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती!
सोलापूर, – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सहावा नामविस्तार दिनाचा सोहळा गुरुवार, दि. 6 मार्च 2025 रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त ग्रंथदिंडी, राष्ट्रीय चर्चासत्र तसेच विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार असल्याची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली.
2004 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात केवळ एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या सोलापूर विद्यापीठाचा दि. 6 मार्च 2019 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असा नामविस्तार झाला. या नामविस्तार सोहळ्यानिमित्त विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. 6 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता विद्यापीठ कॅम्पसमधून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात नामविस्तार दिनाचा मुख्य सोहळा व राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. राजनीश कामत हे उपस्थित राहणार आहेत. होळकरशाहीचे लेखक व संपादक देविदास पोटे यांचे यावेळी बीजभाषण होणार आहे.
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात रामभाऊ लांडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर जीर्णोद्धार व वर्षासने या विषयावर तर विनिता तेलंग यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक व सांस्कृतिक धोरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शिवाजी वाघमोडे हे असणार आहेत. दुसऱ्या सत्रात प्रा. बाबासाहेब दुधभाते यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महेश्वर या विषयावर व्याख्यान होईल. याचबरोबर डॉ. चंद्रकांत चव्हाण हे अहिल्यादेवी होळकर यांचे कल्याणकारी प्रशासन या विषयावर तर वर्षा चौरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला सबलीकरण या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गौतम कांबळे हे असणार आहेत. समारोपाचा सत्र लेखक मुरहरी केळे व अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
चौकट:
नामविस्तार सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे: कुलगुरू
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सहाव्या नामविस्तार दिनाच्या सोहळ्याची जय्यत तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सुरू आहे. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीची त्रिशताब्दी वर्ष शासनाकडून साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त विद्यापीठाकडूनही विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धा पार पडल्या. त्याचेही पारितोषिक वितरण नामविस्तार दिनी होणार आहे. त्याचबरोबर विद्यापीठ इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. नामविस्तार दिनाच्या सोहळास प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, विद्यार्थी तसेच समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केले आहे.