पुणे,- गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील स्त्री आधार केंद्राने महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक विशेष स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना सायबर सुरक्षितता आणि सतर्कतेचे महत्त्व पटवून देत प्रेरक मार्गदर्शन केले. या प्रसंगी विकासतज्ञ शिरीष कुलकर्णी यांनी देखिल उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते महिला दक्षता समितीच्या सदस्य आणि स्वयंसेवकांना स्त्री आधार केंद्राच्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यशाळेत प्रथम विकासतज्ञ श्री शिरीष कुलकर्णी यांनी परंपरा ,सण आणि महिलांची सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोशल मीडियाच्या गैरवापरावर प्रकाश टाकताना सांगितले, “आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया संवादाचे शक्तिशाली साधन आहे, परंतु त्याचा गैरफायदा घेणाऱ्या टोळ्या महिलांना फसवण्यासाठी सक्रीय आहेत. या टोळ्या प्रेम, मैत्री किंवा नातेवाईकाचे नाटक करून भावनिक जाळे विणतात आणि आर्थिक फसवणूक करतात.” त्यांनी विशेषतः वृद्ध आणि एकल महिलांना सावध राहण्याचा सल्ला दिला. “रात्री उशिरा येणारे संशयास्पद फोन किंवा अनोळखी व्यक्तींशी अनावश्यक संवाद टाळा. अशा व्यक्ती वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक करू शकतात.त्यामुळे अशा संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने पोलिस किंवा स्त्री आधार केंद्राशी संपर्क साधा. सतर्कता आणि जागरूकता हेच आपले खरे संरक्षण आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या प्रेरक शब्दांनी उपस्थित महिला स्वयंसेवकांमध्ये आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाची भावना निर्माण झाल्याचे त्यांनी मनोगत व्यक्त केले .डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जागरूक राहण्याची प्रेरणा मिळाली. “महिलांनी सावध, सक्षम आणि स्वावलंबी बनून आपल्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या हाती घ्यावी,” असा सकारात्मक संदेश देत डॉ. गोऱ्हे यांनी कार्यशाळेची यशस्वी सांगता केली.स्त्री आधार केंद्राच्या महिला स्वयंसेविका यांनी या व अशा प्रशिक्षणातून महिला सुरक्षिततेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.