पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे नेहमीच युवकांना पाठबळ देतात. त्यामुळे त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारधारेवर चालण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी भूमिका हडपसर मधील युवा नेते कुमार तुपे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
कुमार तुपे यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला, त्यानंत आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका आणि पुढील वाटचाल स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांनी हडपसर मतदार संघातून तुतारीच्या चिन्हावर उभे असलेल्या प्रशांत जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
कुमार तुपे म्हणाले, शरद पवार साहेब हे नेहमीच तरुणांना पाठबळ देण्याचे काम करत असतात. त्यामुळे मी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात मी पुणे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असून त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. पक्ष प्रवेश करताना शरद पवार यांचा आशीर्वादच माझ्यासाठी सर्वकाही आहे.
पुढे ते म्हणाले, आज मी जो काही आहे, तो माझ्या मित्र परिवारांमुळे. त्यांच्या सहमतीनेच मी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्रजी पवार) या पक्षात प्रवेश केला आहे. यापूर्वी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप आबा तुपे आणि आता माझ्या मार्फत एक तरूण चेहरा पक्षाला मिळत आहे. त्याचा या निवडणुकीत निश्चितच राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षाला व पक्षाच्या उमेदवाराला उपयोग होईल, याची मला खात्री आहे. हडपसर मतदार संघात अनेक युवा सहकारी आहेत जे आमच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना पाठबळ देण्याचा, हडपसर परिसरातील नागरिकांच्या ट्रॅफिक ची समस्या,पाण्याची समस्या आणि वीज पुरवठाच्या समस्येचे निवारण करण्याचा आमचा मानस आहे.
हडपसर मतदार संघात आज आयटी कंपन्या असल्यातरी ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. आजही हडपसर परिसरात वाहतूक कोंडीची आणि पाण्याची मोठी समस्या जाणवते. मात्र येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्या मार्फत या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असेही तुपे यांनी सांगितले.