शेगाव निवासी श्री गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथावर आधारित रंगावली
पुणे : शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या गजानन विजय ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित ‘ब्रम्हांडनायक’ या भव्य रंगावली प्रदर्शनाचे आयोजन दिनांक २० ते २३ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले आहे. पुण्यातील ३२ कलाकार त्यांच्या कलेच्या माध्यमातून गजानन महाराजांची विविध रुपे साकारणार आहेत. सकाळी १० ते रात्री ७ यावेळेत बालगंधर्व कलादालन येथे प्रदर्शन पाहता येणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाच्या आयोजक रंगावलीकार शारदा अवसरे यांनी दिली.
शुक्रवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जगप्रसिद्ध रंगावलीकार महादेव गोपाळे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रख्यात रंगावलीकार अक्षय शहापूरकर, ज्येष्ठ रंगावलीकार जगदीश चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शारदा अवसरे म्हणाल्या, प्रदर्शनामध्ये एकूण २३ रंगावलींचा समावेश आहे. गजानन विजय या ग्रंथातील २१ अध्यायांवर आधारित २१ व २ सर्वत्र पाहिले जाणारी अशी एकूण २३ रूपे साकारण्यात येणार आहेत. सर्व रंगावली काढण्याकरिता एकूण ३० किलो रंगावली व रंगाचा वापर करण्यात आला आहे.
प्रदर्शनाकरिता श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे अक्षय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केले आहे. दिनांक २३ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ७ पर्यंत प्रदर्शन विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शन पाहण्यासाठी यावे,असे आवाहनही शारदा अवसरे यांनी केले आहे.