मराठी संगीत रंगभूमी संवर्धन समितीची मराठी भाषा दिनानिमित्त मागणी
महाराष्ट्र शासनातर्फे पुण्यामध्ये ‘मराठी संगीत रंगभूमी संग्रहालय’ उभारले जावे आणि मराठी संगीत नाटकांचे प्रयोग राज्यात सर्वत्र शासनातर्फे आयोजित करावे व हे प्रयोग करणाऱ्या संस्थांना प्रयोगाकरिता आर्थिक निधी मिळावा. या दोन्ही कामांसाठी राज्याच्या आगामी अंदाजपत्रकात कायमस्वरूपी आर्थिक तरतूद होण्यासाठी या विषयाचे हेड ओपन करून प्रारंभी प्रत्येकी १ कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रातील मराठी संगीत रंगभूमी संवर्धन समितीतर्फे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशीष शेलार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मराठी संगीत नाटके सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या वतीने मराठी संगीत रंगभूमी संवर्धन समितीच्या माध्यमातून अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष सुरेश साखवळकर, निमंत्रक प्रवीण प्र. वाळिंबे आणि सदस्य बालगंधर्वांच्या नातसून अनुराधा राजहंस यांनी ही मागणी केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यासारख्या सांस्कृतिकनगरीमधील ‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया’प्रमाणे राज्य शासनाने ‘मराठी संगीत रंगभूमी संग्रहालय’ टप्प्याटप्प्याने उभे करावे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेचादेखील सहयोग घ्यावा. या नियोजित संग्रहालयामध्ये मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास, पुस्तके, ग्रंथ, नाट्यपदे, नाट्यकलांचे रेकॉर्ड्स, जुन्या काळातील शेले, पागोटे, अंगरखे, पोशाख, दागिने, छायाचित्रे, संगीत नाटकांचे व्हिडीओ अशा अनेक बाबींचा समावेश असावा. याच्या देखरेखीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक व्हावी. रसिकांसाठी हे संग्रहालय विनामूल्य खुले असावे. आगामी ३ वर्षांत हा प्रकल्प पूर्ण व्हावा.
महाराष्ट्र शासनाने मराठी संगीत नाटकांचे महोत्सव अथवा प्रयोग राज्यात विविध ठिकाणी सातत्याने आयोजित करावेत. मराठी संगीत नाटकांचे प्रयोग सादर करणाऱ्या संस्था व कलाकारांना उचित अर्थसाहाय्य करावे. राज्य शासनाव्यतिरिक्त खासगीरीत्या असे प्रयोग करणाऱ्या संस्थांनाही आर्थिक सहयोग करावा. यासाठी राज्याच्या आगामी अंदाजपत्रकात या विषयाचे संबंधित हेड ओपन करून आपण वरील दोन्ही विषयांसंदर्भात प्राथमिक तजवीज म्हणून प्रत्येकी किमान १ कोटी रुपयांची तरतूद करावी. तसेच या विषयाशी संबंधित संस्था, कलाकार, नाट्यलेखक व समीक्षक यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमून या प्रस्तावांना अंतिम स्वरूप द्यावे, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.