मुंबई, : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आज राजभवन, मुंबई येथील दरबार हॉलमध्ये पार पडला. सकाळी ११.०० वाजता झालेल्या या शपथविधी प्रसंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यातील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू छत्रपती पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. नव्या जबाबदारीसाठी त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे कार्य फलदायी ठरो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
राज्यपाल शपथविधी सोहळा ही घटना लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाची पायरी असल्याचे प्रतिपादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याच्या शासनव्यवस्थेत नवी ऊर्जा आणि दिशा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.