पंढरपूर :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस श्री दत्त आश्रम संस्थान जालना यांचेकडून दोन लाख 15 हजार किंमतीचे अन्नधान्य व इतर वस्तू प्राप्त झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
मंदिर समितीचे श्री संत तुकाराम भवन येथे अन्नछत्र असून, या अन्नछत्रास उपयोगी साहित्य म्हणजे स्टील बादली 24 नग, जर्मन पाट्या 24 नग, वगराळे 24 नग, भातवाढी 24 नग, स्टील टब 12 नग, जर्मन पातेले 6 नग, स्टील जार 6 नग, सतरंजी, स्टील टोप 12 नग, धान्याचे डबे 6 नग, प्लास्टीक बादल्या 66 नग, प्लास्टीक मग 24 नग, गॅस शेगडी 5 नग, स्टीलचे जग 6 नग इत्यादी सुमारे 1 लाख 80 हजार किंमतीचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय, 100 किलो साखर, 100 किलो गहू, 100 किलो तांदूळ, 100 किलो तुरीची दाळ, 100 किलो हरभरा दाळ व 45 किलो खाद्यतेल इत्यादी सुमारे 35 हजार किंमतीचा किराणा माल देखील उपलब्ध करून दिला आहे. यावेळी श्री दत्त आश्रम संस्थान जालना यांचे विश्वस्त, विभाग प्रमुख संजय कोकीळ व सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी उपस्थित होते.
मंदिर समितीमार्फत भाविकांना श्री संत तुकाराम भवन येथे दुपारी 12.00 ते 2.00 व सायंकाळी 7.00 ते 9.00 या वेळेत मोफत भोजन प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. त्यामध्ये दैनंदिन 3000 ते 3500 भाविक लाभ घेतात. या अन्नछत्रामध्ये अन्नदान करावयाचे असल्यास “अन्नछत्र सहभाग योजना” उपलब्ध असून, या योजनेत किमान 7 हजार पासून पूढे रक्कम दिल्यास, इच्छित दिवशी अन्नछत्रात अन्नदान करता येते. याशिवाय, अन्नधान्य व किराणा माल व इतर भेट वस्तू देखील स्विकारल्या जातात अशी माहिती यावेळी श्री श्रोत्री यांनी दिली.