पिंपरी, : सत्वगुणाची गाठ ओळखली तर तुमचा संसार आणि म्हणजेच जन्ममरणाचा शिमगा सफल होईल, असे प्रतिपादन हभप महादेव महाराज राऊत यांनी केले.
श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी (३७५) वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त आयोजित गाथा पारायण आणि कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. हा सोहळा श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू आहे. सेवेसाठी महाराजांनी शांतीब्रह्म संत एकनाथांचे होळी/ शिमग्याचे रूपक असलेले भारुड घेतले होते.
सत्त्व गांठीं उमगा । तेणें सफळ होईल शिमगा । तुम्ही हेंच गाणें गा । तुम्ही हसूं नका ॥ १॥
हे एक कूट स्वरूपाचे भारुड आहे. राऊत महाराज म्हणाले की, हिंदू धर्मामध्ये विविध सण येतात त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. संतांनी सणांची महती पटवून देण्यासाठी वेगवेगळी चिंतने मांडलेली आहेत. संत एकनाथ हे तुकोबारायांचे श्रद्धास्थान होते. मनुष्य जन्माला येऊनही जर हरिनामाचा जप केला नाही तर या जगाचा उद्गाता त्यावर जाब विचारेल आणि मग माणसाकडे पश्चात्ता सोडून काहीच करता येणार नाही.
राऊत महाराज म्हणाले की, सत्वगुणाची गाठ ओळखली तर तुमचा संसार आणि म्हणजेच जन्ममरणाचा शिमगा सफल होईल. म्हणून मेल्यानंतर डाव्या हाताने आणि शिमगा, होळीच्या वेळी उजव्या हाताने बोंब मारतात. शिमगा या शब्दाचा अर्थ आहे शिम एवं गा किंवा शिव उमगा इति शिमगा. म्हणजेच शिव गात राहा किंवा शिवाला ओळखा. आजच्या दिवशी शिवानी काम जाळला म्हणून आपणही जीवनात काम नष्ट करावा. मग संसार शिमगा सफल होईल.
राऊत महाराज म्हणाले, संतांनी आपल्या संसाराची होळी केली, म्हणून आपल्या संसार सुखाचा होतो आहे. मृत्यूच्या वेळी जाळताना शेवटी तोंडावर गोवरी ठेवली जाते ही नामस्मरणाची जनाबाईची गोवरी असते. शिमगा हा जरी थोडा रंगाढंगाचा उत्सव असला, तरी या शिमग्याचे रूपक नाथांनी फार सुंदर पद्धतीने वर्णिले आहे. लौकिक अर्थाने पाहिले, तर राजदरबारापासून सामान्यजनांपर्यंत सारे मराठमोळे मन या रंगोत्सवात होलिकोत्सवात रंगून जायचे. शृंगाराची उधळण व्हायची. त्यामुळे होलिकोत्सव एक वेगळेपण देऊन जायचा; पण संत एकनाथांनी या सणाचे एक श्रेयस रूप, तत्त्वरूप मांडलेले आहे. मदनदहनाची, होलिका राक्षिसिणीची कथा आपल्याला माहीत आहे; पण नाथांनी एक वेगळे तत्त्व सांगितले आहे.
त्यामुळेच पुढे आसक्ती विकार जन्माला येतात, असे नाथांनी म्हटले आहे. अशाप्रकारे रजोवृत्तीत न राहता विकृतीपासून मुक्त करणारा, लौकिकार्थाने शृंगारविलासात रमणारा; पण अंतर्यामी विकारविकृतींना घालवून देणारा, जीवनाला वेगळा रंग देणारा असा होळीचा सण आहे.
यावेळी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार विदुरावजी नाना नवले, मुळशी तालुक्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यावेळी उपस्थित होते.
चरित्र कथा
हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (छोटे माऊली) हे तुकोबारायांची चरित्रकथा सांगत आहेत. पाचव्या दिवसाच्या कथेत ते म्हणाले की, जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या पितरांना जेवायला घातले. येथे सुद्धा भगवंत यांच्या मदतीस येतात. दान देण्याच्याबाबतीत संत हे कल्पतरूला मागे सारतील असे त्यांचे दातृत्व असते. स्नानाला बसलेल्या आपल्या पत्नीची एकच साडी होती. ती सुद्धा तुकोबारायांनी एका वृद्ध महिलेला दान करून टाकली. भक्ताची लाज राखण्यासाठी भगवंताने आपला पितांबर जिजाई आईसाहेबांना दिला.
तुकोबारायांनी एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीला तेल आणून दिले ते तेल काही केल्या संपेना म्हणून गावातील सगळ्यांनीच तुकोबारायांना तेल आणण्यासाठी आपल्या जवळच्या बुदल्या दिल्या. तुकोबारायांच्या दोन्ही हातात गळ्यात सगळीकडे बुदल्याच बुदल्या होत्या, असे अनेक प्रसंग छोटे माऊली यांनी कथनातून सांगितले. संतांचा जन्म हा परोपकारासाठीच असतो हे जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःच्या कृतीतून दाखवून दिले. तुकोबारायांच्या जीवनातील अनेक प्रसंग ह भ प कदम माऊली यांनी रंगवून सांगितले आणि भक्तांना मंत्रमुग्ध केले.
नितीन महाराज काकडे यांची कीर्तनसेवा
तिन्ही त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥ या अभंगावर नितीन महाराज काकडे यांनी कीर्तनसेवा सादर केली. काकडे महाराज म्हणाले की, या अभंगात साधू संतांचे वैभव, बळ आणि सत्ता याचे वर्णन केले आहे. वारकऱ्यांच्या फक्त झोळ्या पाहू नये तर त्यांचे अध्यात्मिक वैभव पहावे. सर्वसामान्य माणसांचे वैभव स्थावर जंगम यावर अवलंबून असते. तर संतांचे वैभव त्रिभुवनात सामावलेले आहे. जगावर ज्याची सत्ता त्यालाच आम्ही मायबाप मानले आणि आम्ही आपोआप त्रिभुवनाचे धनी झालो.
काकडे महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तुकोबांना भेटायला आले. तेव्हा चौदाशे मावळे शिवरायांच्यासोबत होते. सुरुवातीला ते सगळे मावळे खालीच होते. मग, तुकोबारायांनी त्यांना वर बोलावले आणि सर्वांना जेवू घालून मोठा भंडारा घातला म्हणून हा भंडारा डोंगर. नंतर शिवराय आणि तुकोबा एकत्र जेवले. शिवरायांनी सुद्धा त्यांच्या टोपल्यातली भाकरी खाल्ली. त्यामुळे भंडारा डोंगरावरची माती पवित्र आहे.
उद्याचे कार्यक्रम
१५ मार्च – हभप चैतन्य महाराज देगलूरकर (स. ११), हभप रामभाऊ महाराज राऊत (सायं. ६) यांचे कीर्तन होईल.
…