पुणे- – भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा आणि दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ऑगस्ट, 2025 (रविवार) रोजी कोथरुड (नळस्टॉप जवळ, पाडळे पॅलेस समोर) येथील केंद्राच्या आवारात दिव्यांगांसाठी मोफत कृत्रिम अत्याधुनिक अवयव प्रदान शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती केंद्रप्रमुख विनय खटावकर व शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष निलेश गोरे यांनी आज येथे दिली. या शिबिरासाठी आर्थिक सहायता करणार्या मिलन रायजादा फाउंडेशनच्या संस्थापिका पूनम डाके यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी माहिती देताना खटावकर म्हणाले की, भारत विकास परिषदेच्या दिव्यांग पुरृनर्वसन केंद्राने एपिल,2025 मध्ये एकाच शिबिरात 892 दिव्यांगांना कृत्रिम पाय मोफत बसवून जागतिक विक्रम केला असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची बाजारातील किंमत 50 हजार व कृत्रिम हाताची किंमत 25 हजार रुपयांपर्यंत आहे. हे कृत्रिम अवयव या शिबिरात सर्व दिव्यांगांना मोफत देण्यात येणार आहेत. दिव्यांगांना कोणतेही निकष लावले जात नाहीत, सुरुवातीला माप घेवून, मेडिकल चेकअप करुन त्यानुसार कृत्रिम हात, पाय लावण्यात येतात. समाजासाठी चालविण्यात येणारा हा सेवायज्ञ आहे. या सेवा यज्ञात मिलन रायजादा फाउंडेशन ही सेवाभावी संस्था सहभागी झाली असून यंदाचे हे सलग दुसरे वर्ष आहे. दिव्यांगांना शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असून यासाठी 7378913197 या मोबाईलवर किंवा 020-29972349 या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.