पुणे – शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थी विकासाच्या प्रयोगशाळा बनायला हवीत. शैक्षणिक संस्थांनी प्रभावी अध्यापनासोबत अध्ययनकेंद्री दृष्टिकोन ठेवल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणव्यवस्था उभी करणे शक्य आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार आणि आयटी तज्ञ डॉ. उदय निरगुडकर यांनी केले. एसएनडीटी गृहविज्ञान महाविद्यालय आयोजित ‘संस्कृता’ व्याख्यानमालेत ते बोलत होते. गृहविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण तसेच सिनेट सदस्य डॉ. महेश कोलतमे व्यासपीठावर उपस्थित होते.

सतराव्या शतकात जागतिक बाजारपेठेत भारताचा वाटा पंचवीस टक्के होता. तो आज पाच टक्क्यांवर घसरला आहे. त्याकाळी सकल राष्ट्रीय उत्पादनात महिलांचे योगदान लक्षणीय होते. त्याचा पाया येथील मूलभूत शिक्षण व्यवस्थेमध्ये होता. परकीय आक्रमणांतून ही व्यवस्था जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आल्याने देशाची अधोगती झाल्याचे डॉ. निरगुडकर म्हणाले. व्यक्तिगत यश साजरे करण्यापेक्षा सामूहिक यश साजरे करून टीमवर्कला प्रोत्साहन दिल्यास व्यापक कार्य घडू शकते, याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.

प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी प्रास्ताविकपर मनोगत मांडले. स्वयंपूर्ण सबला घडविण्याच्या ध्येयपथावर एसएनडीटी महिला विद्यापीठ अग्रेसर असून मा. कुलगुरूंचा या कामी नेहमीच पाठिंबा असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. महेश कोलतमे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवी पाटणकर यांनी केले. सिनेट सदस्य प्रा. सुरेंद्र निरगुडे, विविध विभागांचे प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या