पुणे — वनराईच्या इको क्लबमधील विद्यार्थ्यांनी कीर्तन आणि पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत ‘ग्रीन एक्स्पो २०२६’मध्ये जनजागृती केली. शिंदवणे येथील संत यादव बाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कीर्तन सादर केले, तर पुण्यातील शेत हिरालाल प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘आता तरी जागा हो माणसा’ हे पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
एखाद्या पारंपरिक कीर्तनकाराप्रमाणे विद्यार्थ्यांनी कीर्तनाचे सादरीकरण केले. हुबेहूब कीर्तनकारांची वेशभूषा परिधान करून आणि त्यांच्याच शैलीतील संवाद साधत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे मांडला. त्यामुळे काही काळ संपूर्ण परिसर भक्तिमय आणि पर्यावरणमय वातावरणाने भारून गेला. या सादरीकरणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे आयोजित ‘ग्रीन एक्स्पो २०२६’ या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन जलसंवर्धन कार्यासाठी ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले.
या वेळी रोटरीचे प्रकल्प प्रमुख केशव ताम्हणकर, प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी पुणे विस्डमच्या अध्यक्षा स्वाती यादव तसेच वनराईचे विश्वस्त सागर धारिया, सचिव अमित वाडेकर उपस्थित होते. प्रदर्शनासाठी वनराई, पुणे महानगरपालिका, जे. पी. श्रॉफ फाउंडेशन आणि टाटा ग्रीन बॅटरीज यांचे सहकार्य लाभले.
संभाजी उद्यानात भरविण्यात आलेल्या या एक्स्पोमध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे ३५ हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. सौर ऊर्जा उपकरणे, बांबूपासून तयार वस्तू, नारळाच्या करवंट्यांपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक वस्तू, आयुर्वेदिक उत्पादने तसेच लघु तृणधान्यांचे स्टॉल्स यामध्ये सहभागी झाले होते. विविध सत्रांद्वारे पर्यावरण विषयक मार्गदर्शनही करण्यात आले.


