27.4 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त सुवर्ण कलशाचे पूजन

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, ह.भ.प. नारायण महाराज जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, बापूसाहेब पठारे, महेश लांडगे, बाबाजी काळे,देवेंद्र पोटे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्ये जपाण्याचे श्रेय वारकरी संप्रदायला आहे. ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असतांना राजकीय गुलामगिरी स्वीकारली, पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही. वारकरी परंपरेने आणि संतांनी जात, धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे, २१ वर्षाच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे. म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले. विचार आणि तत्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही ते म्हणाले.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, अर्जुनाला कर्म मार्ग दाखविण्यासाठी भगवान योगेश्वराने गीता सांगितली, गितेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस आजच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग आहे. भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्ण कलश चढविला गेला. सुवर्ण कलशासोबत महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल.

भगवद्गीतेतील तत्वज्ञान हे जगातले सर्वोत्तम तत्वज्ञान असून ते जगात स्वीकारले जात आहे. माऊलींनी ९ हजार ओव्याच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओ बुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

लहान ऑडिओ क्लिपद्वारे ज्ञानेश्वरीचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवा-एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मंदिराच्या महाद्वारातून भक्त माऊलीचा गजर करीत पुढे जातात. ही वारकरी परंपरा फार मोठी आहे आणि ती पुढे नेत असताना समाधी मंदिरावर सुवर्ण कलश चढविला जाणे ही महत्वची घटना आहे. भाविकांच्या योगदानामुळे या क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांनाच मिळाले. वारकऱ्यांसाठी ज्ञानोबा हा श्वास आणि आळंदी ही काशी आहे, अलंकापुरी म्हणून परिचित असलेली आळंदी मराठीसाठी आणि भागवत धर्मासाठी महत्वाचे स्थान आहे. आज नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भागवत धर्मातील विचार प्रसाराची ही परंपरा पुढे नेण्यासाठी ज्ञानेश्वरी ऑडिओ बुकचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या दोन ते तीन मिनिटांच्या ऑडिओ क्लिप तयार करून पुढच्या पिढीपर्यंत हा विचार अधिक प्रभाविपणे पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. शिंदे म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. वारकरी संप्रदाय समाजाला सन्मार्ग दाखविणारी मोठी शक्ती आहे. त्यामुळे आपली संस्कृती कोणीही नष्ट करू शकला नाही. संत महात्मे अशावेळी सुविचार समाजात रुजवीत होते. संत ज्ञानेश्वरांनी कर्म, ज्ञान, सदाचार, नीती, भक्तीची शिकवण दिली, त्यातून समाजाला विशालदृष्टी मिळाली. शेकडो वर्षानंतर आजही माऊली अखंड आणि पवित्र अग्निहोत्राप्रमाणे जगाला उर्जा आणि प्रेरणा देत आहेत. त्यामुळे या महाद्वारातून प्रवेश करतांना मीपण, अहंकार गळून पडेल सात्विकतेचा अनुभव भक्तांना मिळेल, असे त्यांनी सांगितले. आळंदी विकास आराखड्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात सौर ऊर्जेचा उपयोग सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णकलश पूजन आणि श्री ज्ञानेश्वरी(सार्थ) ऑडिओ बुक विविध भाषेत उपलब्ध असलेल्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या संकेतस्थळाचे विमोचन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित भाविकांच्या वर्गणीतून तयार करण्यात आलेला हा २२ किलोचा सुवर्ण कलश समाधी मंदिरावर चढविण्यात आला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महाद्वार जीर्णोद्धार कार्यारंभ पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सुवर्णकलश आणि महाद्वारासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. रोहणी पवार, चैतन्य कबीर, पुरुषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
27.4 ° C
27.4 °
27.4 °
32 %
4.2kmh
0 %
Thu
30 °
Fri
31 °
Sat
33 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!