पुणे : बौद्ध धम्म प्रसारक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान अनागरिक धम्मपाल ( श्रीलंका ) यांची 161 व्या जयंतीचे औचित्य साधून आज येरवडा नागपूरचाळ येथील त्रिरत्न विहारात पद्मपाणि फाउंडेशनच्या वतीने माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय पाली भाषा दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपले विचार व्यक्त करताना अनागारीक धम्मपाल हे श्रीलंकेतून भारतात येऊन भगवान बुद्धाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी संपूर्ण हयात भर भारतात राहिले व त्यांनी भगवान बुद्धाची जन्मभूमी ही बौद्धांच्या ताब्यात असावी असा महत्त्वपूर्ण विचार या देशात रुजवल्याने त्यांची धम्मा विषयीचे महत्त्व यातून स्पष्ट होत आहे. आज अनागरिक धम्मपाल यांची जयंती संपूर्ण देशभर पाली भाषा दिवस म्हणुन साजरी होत आहे असे सांगितले.
यावेळी पाली भाषेचे महत्व सांगणायासाठी विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. पद्मपाणी फाउंडेशनचे राहुल डंबाळे यांनी अनागरिक धम्मपाल यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत बौद्ध धम्म चळवळीतील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सध्या सुरू असलेल्या बोधगया बुद्ध विहार महामुक्ती आंदोलनाचे तेच एक मात्र प्रणेते असून सुमारे 130 वर्षांपूर्वी त्यांनी हा लढा सुरु केला असल्याची माहीती दिली. प्राचीन असलेल्या पाली भाषा संवर्धनासाठी अनागारिक धम्मपाल यांचे कार्य अतुलनीय स्वरूपाचे असल्याने ते बौद्ध धर्म चळवळीसाठी कायम दीपस्तंभ असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.
दरम्यान अनागरिक धम्मपाल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालीभाषा संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपयोजनांची माहिती यावेळी देण्यात आली.