पुणे: देशात शेतमालासह फलोत्पादन आणि निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा अग्रगण्यवाटा असून, प्रतिकूल परिस्थितीत बारमाही फळबागा टिकविणे हेआव्हानात्मक असते. अशा वेळी शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनाच्या सुविधा प्लास्टिक आच्छादनातील शेततळ्यांद्वारे उपलब्ध झाल्याने जलसंधारण आणि फलोत्पादनाला नवे बळ मिळाले आहे. या क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून, सामुदायिक व वैयक्तिक शेततळ्यांच्या योजनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळेच महाराष्ट्राचा देशपातळीवर विशेष उल्लेख होतो, असे मत महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे (एनएचएम) माजी संचालक डॉ. कैलास मोते यांनी व्यक्त केले.

शेततळ्यांची गुणवत्तापूर्ण जोडणी करून त्यांचा टिकाऊपणा वाढविण्याच्या उद्देशाने मिपा इंडस्ट्रीज (मिपाटेक्स) आणि वेल्डी – लिस्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच‘जिओवेल्ड कनेक्ट २०२५’ या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे करण्यात आले. या वेळी डॉ. मोते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मिपाटेक्स, हा मिपा इंडस्ट्रीजचा अग्रगण्य ब्रँड असून पॉलिमर आधारित शेती आणि जलसंधारणासाठी आधुनिक उपाय प्रदान करतो. तर वेल्डी – लिस्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लि. प्लास्टिक वेल्डिंग तंत्रज्ञानातील अचूकता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. दोन्ही संस्थांचे ध्येय गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ शेततळी उपलब्ध करून देणे, जे शेतकऱ्यांना जलसंधारणासाठी अधिक कार्यक्षम आणि दीर्घकालीन उपाय देतात.
कार्यक्रमाला भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पुणेचे उपसंचालक अक्षय कुटे, मिपा इंडस्ट्रीजचे संचालक प्रकाश रिजाल, प्रदीप वाघ, मॅनेजर आनंद ताटे, आनंद दास, विशाल मुखी, राजकुमार सिंग, राजकुमार पवार, विशाल चव्हाण, तसेच वेल्डी कंपनीचे जिनिश जोसेफ आणि यशोदीप जाधव उपस्थित होते.
या वेळी बीआयएसचे अक्षय कुटे यांनी शेततळी उत्पादक व वितरकांनी आयएसआय मार्क असलेली उत्पादने पुरवावीत आणि मानकांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले. वेल्डीचे जिनिश जोसेफ यांनी राजस्थानही मोठी बाजारपेठ असल्याचे सांगून प्लास्टिक वेल्डिंग तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सचिव नितीन पटवा व खजिनदार करण मेहता यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश रिजाल आणि प्रदीप वाघ यांनी आभार मानले.