28.8 C
New Delhi
Thursday, October 9, 2025
Homeमहाराष्ट्रदेशातील पहिली ‘ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड’ लिस्टिंग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नावे!

देशातील पहिली ‘ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड’ लिस्टिंग पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नावे!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महापालिका प्रशासनाचे कौतुक

मुंबई/पिंपरी – पर्यावरणपूरक शहर विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत पिंपरी-चिंचवड महापालिकेने देशातील पहिली ‘ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड’ लिस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण केली. मुंबई शेअर बाजाराच्या इंटरनॅशनल कन्व्हेन्शन हॉलमध्ये झालेल्या विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बाँडचे लिस्टिंग करण्यात आले.

या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या संपूर्ण प्रशासनाचे विशेष कौतुक केले. त्यांनी म्हटले, “पिंपरी-चिंचवड महापालिकेने देशातील महापालिकांसमोर एक आदर्श उभा केला आहे. ‘ग्रीन बाँड’ इश्यूला उद्योग व गुंतवणूकदारांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, हे विशेष कौतुकास्पद आहे.

200 कोटींचा निधी, 5.13 पट मागणी

महापालिकेने हरित कर्ज रोख्यांद्वारे (Green Bonds) सुमारे 200 कोटी रुपये उभारले असून, इश्यू सुरू होताच अवघ्या एका मिनिटातच 100 कोटी रुपयांचा भाग भरला गेला. एकूण 513 कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्याने या बाँड इश्यूला 5.13 पट मागणी लाभली. क्रिसिल आणि केअर या पतमापन संस्थांकडून या बाँडला AA+ दर्जा प्राप्त झाला असून, 7.85% व्याजदराने 5 वर्षांच्या कालावधीसाठी हे बाँड जारी करण्यात आले आहे.

‘ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर’साठी महत्त्वाची वाटचाल

या निधीतून शहरात हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणीनगर चौकदरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प राबवला जाणार आहे. हरित सेतू प्रकल्प अंतर्गत पादचारी व सायकल चालणाऱ्यांसाठी सुरक्षित व सुलभ मार्ग विकसित केला जाणार असून, तो बसस्टॉप, मेट्रो स्टेशन, शाळा, महाविद्यालये, बँका, कार्यालये इ. ठिकाणी जोडणारा असेल. त्यामुळे वाहनांचा वापर कमी होऊन इंधन बचत, प्रदूषण कमी आणि आरोग्यदायी जीवनशैलीस प्रोत्साहन मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून व्यापक पाठिंबा

या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषद आमदार अमित गोरखे, आयुक्त शेखर सिंह, सुजाता सौनिक, असीम गुप्ता, डॉ. के. गोविंदराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी बाँड लिस्टिंगच्या तयारीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सुंदर रमण राममूर्ती, बँकर्स, ऑडिटर्स आणि रेटिंग एजन्सीजचेही विशेष कौतुक केले.

केंद्र सरकारकडून 20 कोटींचा प्रोत्साहन निधी

देशातील पहिली ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड इश्यू करणारी महापालिका ठरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेला केंद्र सरकारकडून 20 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदानही मिळाले आहे. यामुळे शहरात ‘ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर’साठी नवे दालन खुले झाले आहे.

“आजचा दिवस अभिमानाचा” – महेश लांडगे

या ऐतिहासिक यशाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडसाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे. ‘ग्रीन बॉन्ड’ लिस्टिंगमुळे शहराच्या प्रगतीला आणि पर्यावरणपूरक विकासाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल. हे यश राज्य सरकार, महापालिका आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
28.8 ° C
28.8 °
28.8 °
35 %
4.4kmh
0 %
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!