पंढरपूर-: प्रतिवर्षाप्रमाणे श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचे दिनांक 20 मे रोजी सकाळी 6 वाजता टाळ, मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाचा जयघोष करत श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्यासाठी प्रस्थान झाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर तसेच श्री संत मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत मुक्ताई अंतर्धान सोहळ्यानिमित्त श्री पांडुरंगाच्या पादुकांचे प्रस्थान झाले. मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी मुक्ताईनगरचे ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे व इतर पदाधिकारी तसेच मंदिर समितीचे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे, सहाय्यक विभाग प्रमुख तथा पुजारी संदीप कुलकर्णी व प्रसाद दशपुत्रे उपस्थित होते.

या पालखी सोहळ्यामध्ये पूजाअर्चा करण्यासाठी व सुरक्षिततेसाठी कर्मचारी सोबत पाठविण्यात आले आहेत. हा पालखी सोहळा वाहनातून जाणार आहे. पालखी सोहळ्याचा करमाळा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुक्ताईनगर असा मार्ग आहे. आज पालखीचा मुक्काम छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी होणार आहे.