सोलापूर –छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा शौर्यदिप्त इतिहास अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्रा. सचिन गायकवाड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, व्याख्याते विशाल गरड आदी मान्यवर उपस्थित होते.
🎙️ नरेंद्र पाटील यांचे उद्गार:
“संभाजी महाराजांनी मुघल सत्तेविरुद्ध लढा देत हिंदू धर्म आणि रयतेच्या रक्षणासाठी बलिदान दिले. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून त्यांचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि योगदान अभ्यासक्रमरूपात शिकवले जावे, असे माझे स्पष्ट मत आहे. भविष्यात या केंद्रासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
🏛️ कुलगुरू डॉ. महानवर यांचा संकल्प:
“विद्यापीठाच्या निधीतून अध्यासन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येत्या काळात यासाठी स्वतंत्र संकुल आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे. शासनाला प्रस्ताव सादर करून याला अधिक व्यापक रूप दिले जाईल,” असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.
🏆 विद्यार्थ्यांचा सन्मान:
या कार्यक्रमात MPSC उत्तीर्ण विद्यार्थी, कलेतील विजेते, वक्तृत्व स्पर्धक आणि खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.