जेजुरी,- : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जेजुरी येथील श्री खंडेरायाच्या गडावर मनोभावे दर्शन घेतले. सकाळी लवकर मंदिरात आगमन करून त्यांनी श्री खंडोबाची पूजा-अर्चा केली व राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी तसेच सर्वसामान्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
डॉ. गोऱ्हे यांच्या आगमनावेळी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांनी त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर त्यांनी मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व मंदिर परिसरातील सोयी-सुविधा, स्वच्छता आणि भाविकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत माहिती जाणून घेतली.
यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “जेजुरी हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असून इथे येऊन प्रत्येक वेळी आत्मिक समाधान मिळते. राज्यातील जनतेसाठी चांगल्या योजना राबविण्याची प्रेरणा अशा पवित्र स्थळांवरूनच मिळते.”