पुणे : कोथरुडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या मध्य मंडळाच्या वतीने ‘आणीबाणी काळा दिवस’ साजरा करताना, आणीबाणीतील मिसाबंदींच्या संघर्षमय आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना प्रकाश जावडेकर म्हणाले, “स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी देशात आणीबाणी लागू करून, निरपराध लोकांना तुरुंगात डांबणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेची हत्या होती. देशाच्या स्वातंत्र्य आणि संविधानाच्या पुनर्स्थापनेसाठी झालेला संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.” त्यांनी आणीबाणीतील हालअपेष्टा, महिलांचा तुरुंगवास, आणि देशभरात झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत, त्या काळातील मिसाबंदींच्या जिद्द आणि चिकाटीचे कौतुक केले.
मधुसूदन पारखे यांनी सांगितले, “आणीबाणीच्या काळात तुरुंगवासाचा कोणालाही खंत नव्हती, उलट सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली. अनेकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली.” त्यांनी आजच्या पिढीला या संघर्षाचा इतिहास समजून घेण्याचे आवाहन केले.
या वेळी हिरामण जगताप, श्रीराम (आप्पा) कुलकर्णी, संभाजी ढवरे, अशोकराव नाफडे, श्रीनिवास तेलंग, अनिल रहाळकर, सुभाष काकडे, विजयराव हर्षे, अविनाश देव, कृष्णाजी भडाळे, आनंद करमरकर, विनायक खेडकर, चंद्रशेखर घाटपांडे, प्रा. रघुनाथ काकडे, सोपान चव्हाण, संजयराव रबडे, रवी रबडे, अरविंद शिराळकर, जीना कलगीकर, मोहन थिटे, राजेंद्र कानेटकर, प्रा. अनिल कुलकर्णी, रविंद्र घाटपांडे, शामसुंदर जोशी, विश्वास रथकंटीकर, दिलीपराव नगरकर, विश्वासराव हर्षे, सरमुकादम, अशोक प्रभूणे, मधुसूदन पारखी, जगदिश साठे, मोहनराव पंडित, कुमारजी आठवले, शैला सोमण-पाठक, रंजना शितोळे, मंगला वझे-क्षीरसागर, अमला फडके-वैद्य, प्रज्ञा धारप, श्रीमती मीना भेलके यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, मंडळ अध्यक्ष निलेश कोंढाळकर, माजी अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, जगन्नाथ कुलकर्णी, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.