पिंपरी, – केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे मोहननगर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचा निर्णय नागरिकांना फायदेशीर ठरणार असून, या निर्णयाचे स्वागत लाडू वाटप करून करण्यात आले.
हा आनंदोत्सव भारतीय जनता पक्षाच्या आकुर्डी – संभाजीनगर – शाहूनगर मंडळाच्या वतीने मोहननगर कमानी शेजारील चौकात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे नेतृत्व महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी केले.
यावेळी आमदार गोरखे यांनी सांगितले की, “जातनिहाय जनगणना ही सामाजिक समतेसाठी आणि योजनांच्या योग्य रचनेसाठी महत्त्वाची आहे. हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दर्शवतो.”
त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना या निर्णयाचे महत्त्व समजावून सांगितले आणि सांगितले की, “हा निर्णय केवळ केंद्रात असलेल्या NDA सरकारच घेऊ शकते. सामान्य जनतेसाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे.”
कार्यक्रमात माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भाजप उपाध्यक्ष गणेश लंगोटे, कैलास कुटे, मनिषा शिंदे, चंद्रकांत शिंदे, अविनाश गावडे, जनार्दन तलारे, राकेश ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नागरिकांना लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. परिसरात मोदी सरकारचा जयजयकार होत होता, तर अनेकांनी जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे खुले दिलाने समर्थन करत आभार मानले.