शहराचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता, महापालिकेचा धोरणात्मक निर्णय; काही केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात, तर नव्या केंद्रांसाठी जागा निश्चिती आणि टेंडर प्रक्रिया सुरू.
पिंपरी – : पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार वेगाने होत असताना आपत्कालीन सेवा वेळेवर पोहोचणे गरजेचे ठरत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील विविध भागांमध्ये नव्या अग्निशमन केंद्रांची उभारणी तसेच नियोजन सुरू केले असून काही केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर काहींसाठी जागा निश्चिती व निविदा प्रक्रिया सुरू आहे.
सध्या एकूण १० अग्निशमन केंद्रे कार्यरत असून त्यामध्ये पिंपरी येथील मुख्य अग्निशमन केंद्र, भोसरी उपअग्निशमन केंद्र, मोशी उपअग्निशमन केंद्र, चिखली उपअग्निशमन केंद्र, तळवडे उपअग्निशमन केंद्र, रहाटणी उपअग्निशमन केंद्र, थेरगाव उपअग्निशमन केंद्र, प्राधिकरण उपअग्निशमन केंद्र, चोविसावाडी उपअग्निशमन केंद्र, नेहरूनगर उपअग्निशमन केंद्र इत्यादी केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांमधून शहराच्या विविध भागांमध्ये २४x७ सेवा देण्यात येते. औद्योगिक आणि निवासी भागांसाठी ही केंद्रे महत्त्वाची ठरत आहेत.
पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत असून त्यानुसार सुरक्षितता उपायांची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरते आहे. वाढत्या लोकसंख्येप्रमाणे प्रतिसाद वेळ कमी करणे, शहराच्या प्रत्येक भागात अग्निशमन सेवा पोहोचवणे, मोठ्या औद्योगिक वसाहतींसाठी विशेष सुविधा निर्माण करणे, रहिवासी वस्त्यांमध्ये, नव्या टाउनशिपमध्ये तत्काळ मदत देणे या अनुषंगाने आणखी अग्निशमन केंद्रे बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सध्या पुनावळे, दिघी, निगडी प्राधिकरण येथील हेडगेवार भवन, पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालय याठिकाणी सशक्तता वाढवण्यासाठी या अग्निशमन केंद्रांचे बांधकाम सुरु आहे.
एवढेच नव्हे तर महापालिकेने भविष्यात प्रस्तावित केलेली एकूण ३ अग्निशमन केंद्रांकरिता भूसंपादन करण्याचे कार्य प्रस्तावित केले आहे. त्यामध्ये पिंपळे निलख येथील संरक्षण खात्याचीही जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न विभागाकडून सुरु आहे. नगररचना व इ क्षेत्रीय (स्थापत्य) यांचे मार्फत एकत्रित रित्या चऱ्होली, वर्ल्ड प्राईड सिटी परिसरातील अग्निशमन केंद्रां करिता भूसंपादन करून बांधकाम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भोसरी येथील एमआयडीसीमधील एफ-२ ब्लॉक येथे क क्षेत्रीय स्थापत्य यांच्यामार्फत अग्निशमन केंद्र बांधकाम विषयक टेंडर प्रक्रिया राबवीण्यात येत आहे.
कोट
शहराचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, प्रत्येक प्रभागात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करणे ही वेळेची गरज आहे. नव्या अग्निशमन केंद्रांमुळे मदतीचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल, आणि नागरिकांचा जीव व मालमत्तेचा अधिक चांगल्या पद्धतीने बचाव करता येईल. भविष्यातील आकस्मिक संकटांचा वेळीच मुकाबला करता यावा, यासाठी ही केंद्रे ही केवळ यंत्रणा नसून नागरिकांसाठी सुरक्षा कवच ठरणार आहेत.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
शहराच्या गरजेनुसार विविध प्रभागांमध्ये जागा निश्चिती, आराखडा मंजुरी व निधी वितरणासंबंधीच्या प्रक्रिया सुरू आहेत. या सगळ्या टप्प्यांवर महापालिका नियोजनबद्धपणे कार्य करत आहे. एकूणच शहर रचनेत अग्निशमन केंद्रे केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे तर धोरणात्मकदृष्ट्याही संतुलित असावीत, यावर आमचा भर आहे. परिणामी, कोणतीही आपातकालीन परिस्थिती आली तरी प्रतिसाद वेळ महत्वाचा राहील, आणि मनुष्यहानी व वित्तहानी टाळता येईल.
- प्रदीप जांभळे- पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
नव्या केंद्रांमध्ये आधुनिक उपकरणे, जलद प्रतिसाद देणारे व्हेईकल्स आणि प्रशिक्षित कर्मचारी असतील. प्रत्येक केंद्र स्थानिक गरजेनुसार आणि त्या भागातील संभाव्य धोके लक्षात घेऊन यंत्रणा उभी करत आहे. औद्योगिक क्षेत्रांमध्ये केमिकल फायरसाठी विशेष उपाययोजना, तर रहिवासी भागात धुरामुळे होणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या अग्निशामक केंद्रांच्या माध्यमातून आम्ही केवळ आग विझवण्यावर नव्हे तर सुरक्षेवरही भर देणार आहोत.
- उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, अग्निशमन विभाग