मोहनदास करमचंद उर्फ राष्ट्रपिता महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणारे प्रमुख नेते होते तर दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे थोर स्वातंत्र्यसैनिक आणि मुत्सद्दी राजकीय नेते होते, या दोन्ही महापुरुषांनी भारताच्या जडणघडणीत दिलेले योगदान अभूतपूर्व आहे असे प्रतिपादन उप आयुक्त आण्णा बोदडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महापुरूषांच्या प्रतिमेस उप आयुक्त आण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्न पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती देशभर सर्वत्र साजरी करण्यात येते. महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या विचारांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील नागरिक प्रभावित आहेत. ते नेहमी स्वच्छतेचा आग्रह करायचे, त्यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील इंग्रजांविरुद्धचे असहकार आंदोलन आणि भारत छोडो अभियानामुळे महात्मा गांधी हे देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांचे, देशभक्तांचे आदर्श बनले तर “जय जवान जय किसान ” ही क्रांतिकारी घोषणा करणारे आणि सर्व देशवासीयांचे बळ सेनादलाच्या पाठीशी उभे करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे मुत्सद्दी नेते तसेच प्रखर देशभक्तही होते.