पिंपरी चिंचवड – शहराच्या स्वच्छतेसाठी दैनंदिन मेहनत करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, वेतन, निवास व पदोन्नतीसारख्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने तत्परता दाखवली पाहिजे, असे मत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री शेरसिंग डागोर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डागोर यांच्या अध्यक्षतेखाली सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या, मागण्या आणि त्यांच्या हितासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महानगरपालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, तसेच सफाई कर्मचारी संघटना आणि संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.

‘शहराच्या स्वच्छतेची खरी धुरा सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे,’ अशा शब्दांत डागोर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, “सफाई कर्मचारी अनेकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व वेगवेगळ्या अडचणींमुळे त्रस्त असतात. त्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाने तातडीने मानवतावादी उपाययोजना करून पुढाकार घ्यावा.”
आरोग्य व सुरक्षेला प्राधान्य द्या
बैठकीत विशेषत: सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. डागोर म्हणाले, “धन्वंतरीसारख्या वैद्यकीय विमा योजनांचा फायदा सफाई कर्मचाऱ्यांना विनामूल्य मिळावा आणि यासाठी त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार टाकू नये.” याशिवाय, कर्मचाऱ्यांचे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, “महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवत आहे. तरीही प्रशासन अधिक सक्षम होऊन त्यांच्या सुविधा वाढविण्यास कटिबद्ध आहे.”
वेतन, निवास आणि पदोन्नतीसाठी विशेष उपाययोजना आवश्यक
सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी, निवास समस्या, पदोन्नती, आणि अनुकंपा यांसारख्या मुद्यांवर देखील बैठकीत सविस्तर चर्चा झाली. डागोर यांनी महापालिकेला सूचित केले की, “सफाई कर्मचाऱ्यांचा बहुसंख्य भाग वंचित आणि शोषित वर्गातून येतो. त्यांच्या वारसांना शासनाच्या धोरणांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने कडक प्रयत्न करणे आवश्यक आहे.”
त्यांनी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून या सर्व प्रश्नांवर तत्परतेने उपाययोजना कराव्यात, असा निर्देश देखील दिला.
सफाई कर्मचारी संघटना आणि लाभार्थ्यांच्या समस्या
बैठकीत सफाई कर्मचारी संघटना आणि लाभार्थ्यांनी आपापल्या समस्या मांडल्या. अनेकांनी वेतनाच्या विलंबाबाबत, आरोग्य सुविधा, निवासाचा अभाव आणि कामाच्या वेळी सुरक्षा उपकरणांच्या उपलब्धतेसंबंधी तक्रारी नोंदविल्या. यावर प्रशासकीय अधिकारी आणि आयुक्तांनी त्वरित प्रतिसाद देत या प्रश्नांवर त्वरित कारवाईची हमी दिली.
महानगरपालिकेची पुढाकारांची माहिती
उपायुक्त सचिन पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कर्मचार्यांची संख्यात्मक माहिती, त्यांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सुविधा व लाभांची माहिती सादर केली. आयुक्त शेखर सिंह यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी चालू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि प्रशासनाच्या स्तरावर यावर अधिक वेगाने काम सुरू असल्याचे सांगितले.