पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मतदान केंद्रांची अंतिम निश्चिती केली आहे. शहरातील ३५ लाख ५१ हजार ९५४ मतदारांसाठी ९१८ विविध ठिकाणी एकूण ४ हजार ४ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या मतदान केंद्रांमध्ये शाळा, महाविद्यालये, गृहनिर्माण सोसायट्या तसेच विविध सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे.प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी करण्यात आली असल्याचे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले. पुणे महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार यादीही अंतिम केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा
निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रिया सुलभ, सुरळीत आणि अडथळामुक्त राहावी, यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला मतदारांना मतदान करताना अडचणी येऊ नयेत, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.मतदान केंद्रांवर प्रवेशासाठी रॅम्पची व्यवस्था, व्हीलचेअरची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ शौचालये तसेच मतदारांना मार्गदर्शन करणारे स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहेत. याशिवाय, मतदान केंद्रांवरील गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी पुरेशा प्रमाणात मतदान अधिकारी व कर्मचारी नेमण्यात येणार आहेत.शहराचा वाढलेला विस्तार, लोकसंख्येतील वाढ, नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेली गावे आणि बदललेली प्रभाग रचना लक्षात घेता ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


