पिंपरी चिंचवड : औद्योगिक, कामगारांचे शहर आणि देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात आजही अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याची टीका करत पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीने कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी निर्णायक लढा उभारण्याचा ठाम निर्धार जाहीर केला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शहरातील स्वाभिमानी, संघर्षातून घडलेले आणि प्रामाणिक कार्यकर्ते यांनाच थेट नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार असल्याचा स्पष्ट इशारा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे राज्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असतानाही शहरातील ८ ते ९ हजार उद्योगांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आजही अपुऱ्या असल्याचे चित्र आहे. अनेक दुर्लक्षित भागांतील कष्टकरी वर्ग अजूनही पायाभूत सुविधांपासून वंचित असून, महिलांच्या रोजगाराच्या संधी मर्यादित आहेत. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनले असून, वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.
बीआरटीसारख्या महत्त्वाकांक्षी योजना अपयशी ठरल्या असून, शहरातील अनेक उद्याने खाजगीकरणाच्या वाटेवर असल्याचा आरोपही शहर विकास आघाडीने केला आहे. बचत गटांना कामे मिळत नसल्याने महिलांचा आर्थिक स्वावलंबनाचा प्रश्नही ऐरणीवर आहे. या एक ना अनेक समस्या असूनही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आजपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कायम बाहेरच्या नेत्यांचेच वर्चस्व राहिले असल्याने स्थानिक कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले. प्रत्येक पक्षातील प्रामाणिक, स्वाभिमानी आणि लढवय्ये कार्यकर्ते केवळ निवडणुकीपुरते वापरले गेले आणि नंतर त्यांच्यावर अन्याय झाला, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. या सततच्या अन्यायामुळे कार्यकर्त्यांची एक संपूर्ण पिढी राजकारणातून हद्दपार होत चालल्याचे चित्र आज स्पष्टपणे दिसून येत असल्याचे आघाडीने म्हटले आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीने ठाम पाऊल उचलले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत शहरातील स्वावलंबी, संघर्षातून घडलेले आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते यांना थेट नगरसेवक म्हणून संधी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय यापुढे कदापि सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आघाडीने दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहून पूर्ण ताकदीने हा लढा लढणार असून, शहरातील राजकारणात नवा इतिहास घडवला जाईल, असा आक्रमक निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांना न्याय, शहराला विकास आणि नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी ही लढाई निर्णायक ठरणार असल्याचे संकेत या घोषणेतून मिळत आहेत.


