पुनावळे येथील हायवे अंडरपासवर मोठ्या वाहनांमुळे वारंवार होणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी नवीन हाइट बॅरियर बसवण्यात आला आहे. उंचीच्या मर्यादेपेक्षा मोठी वाहने अंडरपासखाली जाणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. पीसीएमसी प्रशासनाच्या या कृतीमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
पुनावळे,- : मुंबई-बेंगळूरू महामार्गावर पुनावळे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक अंडरपासवर असलेले आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत असलेले जुने व कमकुवत हाईट बॅरियर हटवून त्याजागी नवे हाईट बॅरियर बसविण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी पुढाकार घेऊन हा हाईट बॅरियर तात्काळ बदलून नवीन बसवण्यात यावा याकरिता महापालिका प्रशासनाला पत्र लिहिले होते. त्यानुसार महापालिकेकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

अवजड वाहनांचा अंडरपासमधील प्रवेश रोखण्यासाठी याठिकाणी हाईट बॅरियर बसविण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून हा बॅरियर मोडकळीस आल्यामुळे अंडरपासमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत होता. यावर स्थानिक नागरिकांनी राहुल कलाटे यांच्याकडे याविषयी तक्रार केली. कलाटे यांनी महापालिका प्रशासनाला याविषयी पत्र लिहून तात्काळ हाईट बॅरियर बदलण्याविषयी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत हे बॅरियर बदलण्यात आले आहे.
दरम्यान स्थानिक नागरिकांकडून यावर समाधान व्यक्त केले जात असून, नव्या बॅरियरमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तसेच यासाठी राहुल कलाटे यांचे आभार देखील व्यक्त केले आहेत.