पुणे : महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती (१५०) निमित्त इतिहास प्रेमी मंडळ आणि स्वरुप वर्धिनी यांनी त्यांना १५० पणत्या प्रज्वलित करुन दीप मानवंदना दिली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयजयकाराने सभागृह दुमदुमून गेले.
मंगळवार पेठेतील स्वरूपवर्धिनी संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली व इतिहास जागरणाचे त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. देशभक्तीपर समूह गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे म्हणाले, बिरसा मुंडा यांचा जन्म बिहार येथील छोटा नागपूर येथे गरीब वनवासी समाजात झाला. शिक्षण घेण्यासाठी त्यांना ख्रिश्चन धर्म स्विकारावा लागला. मात्र ब्रिटिशांचे अन्यायी स्वरुप लक्षात येताच ते संतापले. त्यांनी वनवासी युवकांना संघटित व सुसंस्कारित केले. व एक दिवस इंग्रजांविरुद्ध बंड म्हणजे उलगुलान पुकारले.
ते पुढे म्हणाले, अत्यंत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असलेल्या इंग्रजांशी धनुष्य बाणांनी संघर्ष करत हजारो वनवासी वीरांनी छोटा नागपूर परिसर स्वतंत्र केला. दुर्दैवाने या लढ्यास अपयश आले व इंग्रजी कैदेतच बिरसा मुंडा यांचा दुदैवी मृत्यू झाला. मात्र सारा देश पारतंत्र्यात जखडलेला असताना अशिक्षित वनवासी तरुणांनी दिलेला लढा सर्व देशासमोर नवा आदर्श उभा करणारा ठरला. म्हणून अवघे पंचवीस वर्षे आयुष्य लाभलेले बिरसा मुंडा सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. हे सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत, असेही त्यांनी सांगितले. स्वरुप वर्धिनीचे प्रणव बार्डिवाले यांनी सूत्रसंचालन केले.


