14.1 C
New Delhi
Wednesday, January 14, 2026
Homeमहाराष्ट्रवाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा!

नवले पुलाच्या अपघाताची कारणे शोधून आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश

PUNE TRAFFICE | पुणे,- : पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. नवले पुलाच्या ठिकाणी झालेल्या गंभीर दुर्दैवी अपघाताची संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करावी व या मार्गावर आवश्यक त्या लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

पुणे शहरातील वाहतूक सुधारणाबाबत विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे महानगर प्रदेश‍ विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, पुणे शहरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम आदी उपस्थित होते. सेव्ह लाईफ फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष तिवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

सेव्ह लाईफ फाउंडेशनने तीन-चार वर्षापूर्वी नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविण्याबाबत सविस्तर अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, आता झालेला गंभीर अपघात पाहता पुन्हा या मार्गाचे पुन्हा सविस्तर अभ्यास सेव्ह लाईफ फाउंडेशनने सर्व संबंधित शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने करवा, अशा सूचना डॉ. पुलकुंडवार यांनी दिल्या. या अनुषंगाने आपला अहवाल दोन आठवड्यात सादर करू असे श्री. तिवारी यांनी सांगितले.

डॉ. पुलकुंडवार म्हणाले, शहरात वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला दंड केला जावा. तसेच तीनपेक्षा अधिक वेळा उल्लंघन झाल्यास संबंधिताचा वाहनचालन परवाना नियमानुसार निलंबित करणे व त्या उपरही उल्लंघन केले गेल्यास जप्त करण्याची कारवाई करावी.

रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी दरमहा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी व आधीच्या बैठकांमध्ये सुचविलेल्या उपाययोजनांची कामे पूर्ण होतील याची खात्री करावी, असेही डॉ.पुलकुंडवार म्हणाले.

रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेवर सदर रस्ता सुस्थितीत ठेवणे, आवश्यक त्या उपाययोजना करणे, वाहतूक सुरळीत होईल याची जबाबदारी राहील. रस्ता सुस्थितीत नसल्यास संबंधित यंत्रणेवर जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात येईल. महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रम्बलर्स, वाहतूक चिन्हे, फलक, बॅरियर्स लावावेत. सेव्ह लाईफ फाउंडेशनने शहरात वाहतूक कोंडी, अपघात अधिक होणाऱ्या रस्ते, ठिकाणांविषयी अभ्यास करून रस्त्यांच्या डिझाईनमध्ये काही त्रुटी असल्यास उपाययोजना सुचवाव्यात. त्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी.

पुणे शहर वाहतूक शाखेने अतिरिक्त मनुष्यबळाच्या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत वाहतूक शाखेच्या मागणीनुसार संबंधित रस्त्याची मालकी असलेल्या यंत्रणेने वाहतूक नियमनासाठी ट्रॅफिक वार्डन देण्याची जबाबदारी राहील, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

मनपा आयुक्त श्री. राम म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात रस्तांची, पुलांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी पुणे महानगरपालिकेच्यावतीने ट्रॅफिक वार्डन देण्यात येत आहेत. वाहतूक नियमन कामात खासगी स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घ्यावा.

वारंवार अपघात होणाऱ्या ब्लॅकस्पॉटच्या अनुषंगाने कार्यवाही तात्काळ करणे आवश्यक असल्याचे डॉ. म्हसे म्हणाले. पुणे शहरासाठी वाहतुकीच्या अनुषंगाने एकात्मिक नियंत्रण केंद्र आवश्यक असून त्या अनुषंगाने हैदराबाद येथील नियंत्रण केंद्राचा अभ्यास आवश्यक असल्याचे श्री. डूडी म्हणाले. यावर कार्यवाहीचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. यावेळी श्री. तिवारी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

बैठकीला पीएमआरडीएच्या सह आयुक्त पूनम मेहता, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (रस्ते) अनिरुद्ध पावसकर, पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त हिम्मत जाधव, आदींसह राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग, सेव्ह लाईफ फाउंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
54 %
2.6kmh
0 %
Wed
16 °
Thu
22 °
Fri
23 °
Sat
24 °
Sun
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!