
गंगाधाम, पुणे – :निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि राजपिता रमित जी यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन तर्फे आयोजित महिला संत समागम रविवारी (दि. १४ सप्टेंबर) गंगाधाम, मार्केटयार्ड येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे उत्साहात संपन्न झाला. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या समागमात पुणे झोनमधील ३५०० हुन अधिक महिला भक्तांनी उपस्थित राहून सत्संगाचा लाभ घेतला. समागमापूर्वी सकाळी ९ ते १० या वेळेत महिलांनी योगाची प्रात्यक्षिके देखील केली. सदगुरू माताजींची शिकवण आहे कि परमेश्वराने आपल्याला जे शरीर दिलेले आहे ते देखील अनमोल आहे आणि ते तंदुरुस्त ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी सर्व माता भगिनींनी आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी योगाभ्यास केला. या कार्यक्रमात सर्व वयोगटांतील महिला भक्तांचा उत्साहपूर्ण सहभाग पाहायला मिळाला.
उपस्थित सत्संगाला संबोधित करताना प.पू. बहन पूजा दिलवर जी (मुंबई) यांनी सांगितले कि ज्या पद्धतीने आपण नेहमी म्हणतो कि ‘ मुलगी शिकली प्रगती झाली ‘ त्याचपद्धतीने घरातील स्त्री आध्यत्मिकतेच्या मार्गाचा अवलंब करेल तर त्या घरामध्ये स्वर्गीय वातावरण निर्माण होऊ शकेल आणि मानवतेच्या विकासामध्ये सहायक होऊ शकेल. निरंकारी सदगुरूनी नारी शक्तीला सन्मान पूर्वक जीवन जगता यावे यासाठी स्त्रियांना समान दर्जा दिला.
या प्रसंगी भगवद-गीता मधील श्लोकांचा आधार घेऊन त्यांनी समजावले की जिज्ञासू भक्ताने आपल्या अनेक धारणांचा त्याग करून सद्गुरुला शरण जाऊन ब्रम्हज्ञानाची प्राप्ती करणे गरजेचे आहे. आणि असे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला सर्वांमध्ये ईश्वर आणि ईश्वरामध्ये सर्व दिसायला लागतात. अशा भक्ताचे रक्षण स्वयं भगवंत करतात. भगवंताला जाणण्यासाठी कोणत्याही कर्मकांडाची आवश्यकता नाही केवळ परमात्म्यावर निस्वार्थ प्रेम आणि समर्पणाची गरज असते.
आज निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज तेच ब्रम्ह्ज्ञान देऊन समाजामध्ये बंधुत्वाची,एकतेची,समानतेची भावना जागृत करून मानवता प्रस्थापित करण्याचे कार्य करत आहेत.आजचा माणूस भौतिकतेच्या जाळ्यात अडकून एक निरंकार ईश्वरापासून दूर चालला आहे आणि म्हणून समाजामध्ये ताण तणाव, विषमता ,द्वेष,तिरस्कार अशा नकारात्मक विचारांमुळे माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. सर्व सृष्टी निर्माण करता एक ईश्वर आहे आणि प्रत्येक माणसाने त्याला जाणून त्याची भक्ती केली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.
समागमात नाटिका, गीत, अभंग, कविता,विचार आदी सादरीकरणांद्वारे सद्गुरूंचा संदेश पोहोचवताना मराठी, हिंदी, इंग्रजी, सिंधी आणि पंजाबी अशा विविध भाषांचा आधार घेण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा फटकरे व अर्चना पिसाळ यांनी केले. समारोप प्रसंगी पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी सर्व भक्तांचे आभार व्यक्त केले.