– राष्ट्रीय शिक्षण धोरणाची होणार प्रभावी अंमलबजावणी
पिंपरी- चिंचवड – पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावीपणे अंमलबजाणवी करण्यात येणार आहे.तसेच, गीता परिवार यांच्या वतीने शाळांमध्ये बालसंस्कार वर्ग होणार आहेत.
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्याला प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, विद्यार्थ्यांना एक सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) मधील “बॅगलेस शनिवार” या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी गीता परिवाराच्या माध्यमातून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना प्रभावी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. “शिक्षकांना विविध कार्यशाळा आणि प्रशिक्षण देऊन त्यांना विद्यार्थ्यांवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी सक्षम करणे महत्त्वाचे आहे. यासाठी गीता परिवारचे प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त ठरू शकतात. या कार्यक्रमांमध्ये योगसोपान, सूर्यनमस्कार, प्रज्ञासंवर्धन, स्वच्छता अभियान, विज्ञान प्रयोग इत्यादी बाबींचा समावेश केला जाऊ शकतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल आणि शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल.
वास्तविक, तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. यानुषंगाने “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळामध्ये इयत्ता १ ली ते ८ वी या इयत्तांसाठी राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. तसेच विद्यार्थ्यांच्या गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचें उत्तम अध्ययन व्हावे या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
**
विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नैराश्येवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे यासाठी शिक्षणासोबतच बालसंस्कारांची आवश्यकता आहे. त्या अनुशंगाने प्रशासनाला सूचना केली आहे. त्यावर सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.