पुणे: मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर वाढत असल्यामुळे शहरात विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांना नदीचे रूप आले आहे, घरांमध्ये पाणी शिरले आहे व अशा अनेक अडचणींना पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन तात्पुरत्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसदर्भात चर्चा केली. यात पाण्याचा निचरा वेळेत करणे, आपात्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या स्पॅाटवर विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे अशा विविध बाबींवर आयुक्तांना शिवसेना शहरप्रमुखांकडून सूचना देण्यात आल्या.
pune in water

पाऊस पडल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून लोक जखमी झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत, अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत, रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते रहदाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत व अशा अनेक अडचणींना पुणेकर नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच कात्रज-कोंढवा रोडवर रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे करण्यात आलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले व त्यामध्ये एका मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली. तरी हे सगळे विषय रीतसर मांडून शहरात अशी स्थितीनिर्माण झाल्यास त्वरित आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित कराव्यात व नागरिकांवर पावसामुळे आलेल्या या संकटांवर लवकरात लवकर उपाययोजना कराव्या अशा सूचना प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे दिल्या तसेच आपात्कालीन यंत्रणा सतर्क ठेवणे, पाणी साठणाऱ्या ठिकाणी विशेष उपाययोजना करणे, पाणी साठवण्याची कारणे शोधणे या गंभीर विषयांचा देखील लक्ष देऊन तात्काळ पाठपुरावा करावा असेही त्यांनी सांगितले.