चिंचवड- पावसाळा आणि छत्री यांचे एक अतूट नाते आहे. दुकानात मिळणारी नेहमीची काळ्या रंगातली किंवा डिझाइन्सची छत्री प्रत्येकाकडेच असते. पण आपल्याला आवडतील ते रंग, थीम, डिझाईन हे सगळं आपल्या छत्रीवर उतरवण्याची संधी संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीने उपलब्ध करुन दिली. आर हॅन्डमेड व कॅम्लिन यांच्या सहकार्याने छत्री रंगवण्याची कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते.
रविवारी महासागर श्री मोरया गोसावी मंदिरा शेजारील जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवड येथील निसर्गरम्य परिसरांत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत परिसरांतील व वेगवेगळ्या वयोगटातील 40 कलाप्रेमी सहभागी झाले होते.
ढगाळ वातावरणात भारतमातेच्या प्रतिमा पुजनाने व संस्कार भारतीच्या ध्येय गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली.
सुप्रसिध्द चित्रकार सौ. अनघा सागर पाटील यांचे स्वागत संस्कार भारतीचे सचिव सौ. लीना आढाव, व उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांनी केले.
पांढरी शुभ्र छत्री पाण्यात बुडवून त्यावर कॅम्लिनच्या फॅब्रीक रंगांनी कोटिंग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. विविध रंगांनी छत्रीवर नक्षी काढण्यात आली. मार्गदर्शन करताना कोणत्या रंगाची निवड करावी, रंगांचा वापर कशा पद्धतीनं होणं आवश्यक आहे, छत्रीचा एखादा भाग मोकळा ठेवून त्याठिकाणी कोणती संकल्पना मांडता येऊ शकते, आदी विविध मुद्द्यांबाबत सुप्रसिध्द चित्रकार सौ अनघा सागर पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
त्यानंतर कलाप्रेमींकडून छत्र्यांवर विविध रंगसंगतीत विविध चित्रे, नक्षी रेखाटली गेली. प्रत्येकाच्या छत्रीवर वेगवेगळे रंग, रंगांचे ओघळ, रंगीत ठिपके, ठसे, रेषा, गोल, चौकोन, त्रिकोण, नक्षी, फुले, पाने, ढग, पाऊस, पावासच्या कविता, असा सप्तरंगी माहोल अनुभवायला मिळाला. प्रत्येकाने आपल्या मनांतील चित्र, रचना, या पांढऱ्या छत्र्यांवर रेखाटण्यात सर्वजण 2 तास रमून गेले होते.
याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका माननीय अश्विनी गजानन चिंचवडे ह्या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तीन सर्वोत्तम छत्र्यांना कॅम्लिन कंपनी च्या वतीने बक्षिसे देण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी संस्कार भारतीचे उपाध्यक्ष श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर, सचिव सौ. लीना आढाव, हॅन्डमेडच्या सौ. रती देशमुख, कॅम्लिनचे श्री. मंगेश सातपुते, श्री मुकेश यांनी परिश्रम घेतले.