‘
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे येथील वैष्णव शैलेश काकडे यांनी अवघ्या सतराव्या वर्षी कादंबरी लिहून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळविले असून, ‘बियोंड टाइम्स वेईल’ या कादंबरीचे प्रकाशन मावळमधील ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते झाले.
तळेगाव दाभाडेतील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर येथे आयोजित कार्यक्रमाला उद्योजक संजय साने, उद्योजिका निरूपा कानिटकर, युवा उद्योजक रणजीत काकडे, समीर जाधव, नितीन किबे, लेखक वैष्णव काकडे, अमित सुराणा, शैलेश काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी रामदास काकडे म्हणाले, की करिअरच्या बाबतीत प्रतिभावंत तरुणांना परदेशात खूप संधी आहेत. या संधीचे तरुणांनी सोने करावे. जनरल रीलेटीव्हीटी आणि अंतराळआतील तंत्रज्ञानावर आधारित ‘बियोंड टाइम्स वेईल’ विषयावर अवघ्या सतराव्या वर्षी कादंबरी लिहून वैष्णवने तळेगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ट्रान्सफॉर्मिंग एआय, अंतराळ संशोधन आणि ग्लोबल फूड सिक्युरिटी या क्षेत्रांसाठी त्याने केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.
युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरममध्ये आशियातील सर्वात तरुण दूरदर्शी म्हणून नोंद, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आयबीआर अचिव्हर म्हणून झालेली नोंद, तसेच सर्वात तरुण महत्त्वाकांक्षी भौतिकशास्त्रज्ञ अॅडव्हान्सिंग रिलेटिव्हिटी-क्यूआरसी असा जागतिक रेकॉर्ड आणि अमेरिका बुक ऑफ रेकॉर्ड्स : यंगेस्ट पायोनियर ट्रान्सफॉर्मिंग एआय, स्पेस एक्सप्लोरेशन आणि ग्लोबल फूड सिक्युरिटी अशा विक्रमांना गवसनी घातली आहे. त्यामुळे वैष्णव काकडे याचा रामदास काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.