पुणे : शिक्षणातून विद्यार्थी घडतात, विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत यामुळे राज्यकर्त्यांनी लाडका विद्यार्थी योजना राबविण्याची गरज आहे, परंतु आज मतदानाच्या प्रक्रियेत प्राथमिक शाळेचे विद्यार्थी जे देशाचे भवितव्य आहेत, ते येत नसल्याने राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षित असल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे च्या दुसऱ्या वर्धापन दिना निमित्त साने गुरुजी स्मारक येथे विविध शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संविधानांचे अभ्यासक प्रा. सुभाष वारे, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर, प्राचार्य वृंदा हजारे, मुख्याध्यापिका मीरा काटे, पर्यवेक्षक जीवन इंगळे आदी उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, आपला देश आज विविध पातळ्यांवर प्रगती करत आहे, मात्र सामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ज्या गरीबी मुळे अडचणी येतात ती गरीबी काही कमी होत असल्याचे दिसत नाही. शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात आलेला हा शिष्यवृत्ती उपक्रम अतिशय चांगला आहे, त्याला मिळणारी नागरिकांची साथ ही अत्यंत मोलाची आहे. आज राष्ट्रीय एकात्मतेचा एक चांगला अनुभ या शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने आला. सर्व जाती – धर्मातील गरीब विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली गेली याचे समाधान वाटते. प्रा. सुभाष वारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जो वर्ग आर्थिक प्रगती करत आहे त्यांनी ‘ पे बॅक टू सोसायटी’ हे ध्यानात घेऊन नाही रे वर्गाला मदत केली पाहिजे तर महात्मा गांधी यांनी भांडवलदारांना तुम्ही मालक नाही तर विश्वस्त या नात्याने संपत्ती जमवली पाहिजे असे म्हटले होते. या महापुरुषांच्या, आपल्या संताच्या शिकवणीनुसार आजचा उपक्रम खांडेकर यांनी राबविला आहे, या कार्यक्रमातून सामाजिक कृतज्ञतेची भावना व्यक्त होते. शिवाजी खांडेकर म्हणाले, प्रतिष्ठानच्या वतीने आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून हा उपक्रम राबता आहोत. आज २६ विद्यार्थी, विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देत आहोत पुढील वर्षी ही संख्या शंभरच्या पुढे नेण्याचा आमचा मानस आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी तर आभार प्रदर्शन मीनाक्षी संगारे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता उद्योगपति रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.