-पिंपरी:-पिंपरी चिंचवड महापालिकेचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महापालिकेच्या वतीने विविध सांस्कृतिक, क्रीडाविषयक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, खेळ पैठणीचा यांसारख्या विविध कार्यक्रमांची मेजवानी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी ठेवण्यात आली होती. अधिकारी कर्मचारी यांच्यासह आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांनी देखील या कार्यक्रमांचा आनंद घेतला.
तत्पुर्वी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर अभियंता मकरंद निकम,मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात हातभार लावला. या शिबिराचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरादरम्यान आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनारक्तदान करण्याबाबत आवाहन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
महापालिकेच्या प्रशासकीय भवनातील प्रांगणात महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. यावेळी रस्सीखेच स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अधिकारी विरुद्ध कर्मचारी असा सामना बघायला मिळाला. या चुरशीच्या सामन्यात अधिकारी संघाने बाजी मारली. तर महिला अधिकारी कर्मचाऱ्यांमधील रस्सीखेच सामन्यामध्ये कर्मचारी संघाने विजय मिळविला. यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगीत खुर्ची स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये पुरूष अधिकारी, कर्मचारी संगीत खुर्ची स्पर्धेत मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण विजयी झाले. तसेच महिला अधिकारी कर्मचारी संगीत खुर्ची स्पर्धेत माहिती व जनसंपर्क विभागातील पौर्णिमा भोर यांनी विजय मिळविला.
महिला अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेच्या प्रांगणात ‘होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’ हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून मनसोक्त आनंद लुटला. निवेदिका मेघना झुजम यांनी हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महापलिकेच्या विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी गायनाने कार्यक्रमास रंगत आणली आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.